मेळाव्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार
कोल्हापूर – प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचे रेखांकन बदलले असून शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी उद्या मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व शेतकऱ्यांचा मेळावा कसबा बावड्यातील श्रीराम सोसायटीच्या हॉलमध्ये सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे व प्रकाश पाटील यांनी रविवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
या मेळाव्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. सर्वपक्षीय आजी, माजी आमदार, खासदारांना मेळाव्याचे निमंत्रण देण्यात येणार आहे. बदललेल्या रेखांकनाची अधिसूचना ५ मे रोजी जाहीर झाली आहे. यामध्ये कोल्हापुरातील ७८ गावे बाधित होत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले, पन्हाळा, करवीर, राधानगरी, कागल, भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यातून हा महामार्ग जात आहे. परिणामी, बाधित गावांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. गावागावात शेतकऱ्यांच्या निषेध सभा सुरू झाल्या आहेत. नवीन रेखांकनानुसार रस्ता झाल्यास महापुराचे संकट उडवणार आहे. ६ हजार एकर शेती बाधित होऊन साखर कारखान्याच्या ऊस गाळपावर याचा परिणाम होणार आहे. पर्यावरणास धोका निर्माण होणार आहे.
व्याघ्र प्रकल्पामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे हा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्याला खासदार शाहू छत्रपती, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार संपतबापू पाटील, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील -सरुडकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार राजीव आवळे, माजी आमदार राजूबाबा आवळे, ए. वाय. पाटील, राहुल पी. एन. पाटील, सुधीर देसाई, राहुल देसाई, संपत देसाई, सम्राट मोरे, यांच्यासह बाधीत शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.























































