पंचगंगा प्रदूषण आणि कचरा व्यवस्थापनासाठी प्रशासनाला तरुण संशोधकांची साथ हवी” – सीईओ डॉ. जस्मिन

Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions. call-VRUSHALI : 7972306375

शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात एम. एस्सी. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात नुकताच एम. एस्सी. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभ अत्यंत उत्साहात आणि दिमाखदार पद्धतीने पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आयएएस अधिकारी डॉ. जस्मिन, तसेच सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजचे डॉ. सुनील कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. आर. जी. सोनकवडे होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर, एम.एस्सी. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी श्रेयश शिउडकर आणि प्रथम वर्षाची विद्यार्थिनी सुवर्णा सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. सुनील कुलकर्णी यांनी संशोधनाचे महत्त्व विषद केले. त्यांनी मेरी क्युरी यांचे प्रेरणादायी उदाहरण दिले; ज्यांनी तत्कालीन समाजाचा विरोध पत्करून संशोधन केले आणि स्वतः शोधलेल्या मूलद्रव्याला अमेरिकेत आश्रय घेऊनही स्वतःच्या देशाच्या (पोलंडच्या) सन्मानार्थ ‘पोलोनियम’ असे नाव दिले. डॉ. आशुतोष कोतवाल आणि रेडिओ टेलिस्कोपचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कार्ल जानस्की यांची उदाहरणे देत त्यांनी विद्यार्थ्यांना जग बदलणारी उपकरणे आणि समीकरणे तयार करण्याचे आव्हान दिले. “पदव्युत्तर शिक्षण ही खऱ्या अर्थाने शिक्षणाची सुरुवात असते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी दर आठवड्याला किमान एक रिसर्च पेपर वाचून त्याच्या नोट्स काढाव्यात,” असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. तसेच डॉ. अनिल काकोडकर यांच्या कार्याचा गौरव करताना, त्यांच्यामुळेच भारताला स्वस्त आणि सुरक्षित अणुऊर्जा मिळणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...

प्रमुख पाहुण्या डॉ. जस्मिन यांनी आपल्या भाषणात विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा आणि गैरसमजुतींपासून दूर राहून वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याचा आग्रह धरला. विज्ञानाच्या तत्त्वांचा वापर करताना समाजाप्रती संवेदनशीलता असणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीचे प्रदूषण, घनकचरा व्यवस्थापन, आणि अयोग्य शेती पद्धतीमुळे उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाला विद्यापीठातील तुमच्यासारख्या तरुण संशोधकांच्या सहकार्याची नितांत गरज आहे,” असे आवाहन त्यांनी केले. यूपीएससी परीक्षेच्या तयारीबाबत मार्गदर्शन करताना डॉ. जस्मिन म्हणाल्या की, “सीसॅटसाठी दहावीपर्यंतचे गणित आणि संकल्पना समजून घेणे, उत्तर लेखनामध्ये प्रश्नाची अचूक मागणी ओळखणे आणि अनेक पुस्तके वाचण्यापेक्षा एकाच पुस्तकाची उजळणी व स्वतःच्या विश्लेषणात्मक नोट्स काढणे यशासाठी महत्त्वाचे आहे.” केवळ सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता ग्रामीण भागातील समस्या ओळखून नाविन्यपूर्ण स्टार्टअप्स आणि उद्योजकता सुरू करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. पुढे त्यांनी जिल्हा परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन, महिला आरोग्य, पाणी प्रदूषण, आशा वर्कर यांसारख्या राबवण्यात येणाऱ्या शासकीय सामाजिक उपक्रमांमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या सर्वच विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि विभागप्रमुख प्रा. डॉ. आर. जी. सोनकवडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. जस्मिन यांनी विद्यापीठाच्या कार्यक्रमाला आणि विद्यार्थ्यांना प्राधान्य दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले. “विद्यार्थ्यांनी केवळ प्रशासकीय सेवाच नव्हे, तर इतर आर्थिक क्षेत्रांमध्येही करिअरच्या संधी शोधाव्यात आणि आपला दृष्टिकोन व्यापक ठेवावा,” असे ते म्हणाले. निम करोली बाबा चॅरिटेबल ट्रस्ट आणि विभागाच्या माध्यमातून रंकाळा प्रदूषण आणि जल व्यवस्थापनासारख्या सामाजिक प्रश्नांवर सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली.

प्रास्ताविक भाषणामध्ये विभागाची यशोगाथा आणि वाटचाल उपस्थितांसमोर मांडण्यात आली. शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाने पीआयएफसी सेंटरच्या माध्यमातून आतापर्यंत १५,००० पेक्षा जास्त सॅम्पल्स स्कॅन करून विद्यापीठाला लक्षणीय महसूल मिळवून दिला आहे. विद्यापीठाच्या एकूण ६,५०० पब्लिकेशन्सपैकी ३,००० पब्लिकेशन्स भौतिकशास्त्र विभागाचे असून, त्यांना १ लाखापेक्षा जास्त सायटेशन्स मिळणे ही विद्यापीठासाठी अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या विभागाला विविध फंडिंग एजन्सीजकडून २० कोटी रुपयांचे महत्त्वपूर्ण प्रकल्प मिळाले असून, भाभा अणुसंशोधन केंद्राला तंत्रज्ञान हस्तांतरित करण्याचे मोठे कामही विभागाने केले आहे. गॅस सेन्सर, सोलर सेल, पाणी शुद्धीकरण, आणि सुपर कॅपॅसिटर या अत्याधुनिक क्षेत्रांत येथे महत्त्वपूर्ण संशोधन सुरू आहे. याशिवाय, विभागाचे १५० पेक्षा जास्त विद्यार्थी दक्षिण कोरिया आणि इतर देशांत संशोधनासाठी गेले असून ते विभागाचे ‘रिसर्च अम्बेसिडर्स’ म्हणून काम करत आहेत असे प्रा. (डॉ.) केशव राजपुरे यांनी सांगितले. यानंतर एम.एस्सी. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी ऋतुजा निंबाळकर हिने शास्त्रीय नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. एम. एस्सी. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी प्रमोद कोराणे याने आभार मानले आणि या शानदार स्वागत समारंभाची सांगता झाली.

  • विवेकानंद काँलेजची बातमी पहा.. वाचा.