नामदार प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून ५०० विद्यार्थिनींना मोफत सायकली; दुर्गम भागातील मुलींच्या शिक्षण प्रवासाला नवी गती

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

“डोंगर-दऱ्यांतून शिक्षणाला नवी पंखं!”

गारगोटी प्रतिनिधी – भुदरगड तालुक्यातील दुर्गम आणि डोंगरी भागातील मुलींचा शिक्षणाचा प्रवास आता अधिक सुरक्षित, सुलभ आणि आत्मविश्वासपूर्ण होणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या विशेष प्रयत्नातून आणि CSR फंडाच्या माध्यमातून तालुक्यातील तब्बल ७० गावांतील ५०० गरजू विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे भव्य वितरण करण्यात आले.

पाल येथील ‘आबिटकर नॉलेज सिटी’ परिसरात उत्साह, आनंद आणि भावनांनी भारावलेल्या वातावरणात हा प्रेरणादायी सोहळा पार पडला. ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणासाठी दररोज अनेक किलोमीटर पायी प्रवास करावा लागत असल्याची वस्तुस्थिती लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. विशेषतः इयत्ता ५ वी ते ९ वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना या योजनेचा लाभ देण्यात आला. कार्यक्रमात नामदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सायकलींचे कुलूप उघडून हिरवा झेंडा दाखवत विद्यार्थिनींना सायकली सुपूर्द करण्यात आल्या. सायकल मिळाल्यानंतर विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि पालकांच्या डोळ्यांत दाटलेले समाधान हेच या उपक्रमाचे खरे यश ठरले.

“आता आमच्या लेकींची शाळा बुडणार नाही!”

डोंगरी भागात वाहतुकीच्या मर्यादित सुविधा आणि वेळेवर एसटी न मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थिनींना पायी शाळेत जावे लागत होते. त्यामुळे वेळ, सुरक्षितता आणि शिक्षण या तिन्ही बाबींवर परिणाम होत होता. मात्र आता या सायकलींमुळे मुलींचा वेळ वाचणार असून त्या अधिक आत्मविश्वासाने शिक्षण घेऊ शकतील, अशी भावना पालकांनी व्यक्त केली. “आबिटकर साहेबांनी गरिबांच्या मुलींच्या शिक्षणाचा विचार करून आमच्यावर मोठे उपकार केले,” अशा शब्दांत अनेक पालकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ. अर्चना कल्याणराव निकम, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक प्रा. दौलतराव जाधव, पंचायत समिती सभापती विक्रमसिंह पाटील, उपसभापती अरुणा प्रशांत देसाई, माजी सदस्य श्री. मदनदादा देसाई, पंचायत समिती सदस्य सुनिल किरकोळ, धनंजय लाड, कल्याणी युवराज फगरे, युवासेना तालुकाप्रमुख विद्याधर परीट, पांगिरेचे सरपंच मारुती भराडे, विजय रामाणे, भेंडवडेचे माजी उपसरपंच रमेश पाटील, बबन निळपनकर, शेतकरी सेनेचे उपतालुकाप्रमुख युवराज फगरे, प्रशांत देसाई, डी. बी. जाधव, रघुनाथ बोटे, आनंदराव शेवाळेकर, बाबुराव शिऊडकर, अवधूत परुळेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नंदकुमार निर्मळे यांनी केले तर आभार प्रदर्शन संग्राम शिंदे यांनी मानले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.