महावितरणच्या खो-खो संघाने या स्पर्धेवर एकतर्फी वर्चस्व ठेवत विजेतेपदकाची अपेक्षित कमाई
पुणे – येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये सुरु असलेल्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणने कुस्तीच्या १० वजन गटामध्ये ५ सुवर्ण व २ रौप्य पदकांची कमाई करीत सांघिक विजेतेपद मिळवले. तर महावितरणच्या खो-खो संघाने या स्पर्धेवर एकतर्फी वर्चस्व ठेवत विजेतेपदकाची अपेक्षित कमाई केली. तसेच बास्केटबॉलच्या अंतिम लढतीत पंजाब संघाने विजेतेपद मिळवले.
एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत शुक्रवारी कुस्तीच्या १० वजनगटामध्ये शुक्रवारी (दि. ८) अंतिम सामने झाले. यात विविध वजनगटानुसार अनुक्रमे विजेते व उपविजेते पुढीलप्रमाणे. ५७ किलो- १) सुदर्शन पाटील (महावितरण) व जर्नेलसिंग (हिमाचल प्रदेश), ६१ किलो- अश्विन मोरे (महावितरण) व सुरेश कुमार (हरियाणा), ६५ किलो- राजकुमार काळे (महावितरण) व अजय कुमार (हिमाचल प्रदेश), ७० किलो- रणवीरसिंग (पंजाब) व आनंद नागरगोजे (महावितरण), ७४ किलो- सुखबीरसिंग (हिमाचल प्रदेश) व नरेंदरसिंग (पंजाब), ७९ किलो- अखिल मुजावर (महावितरण) व शेरोसिंग (पंजाब), ८६ किलो- अजय कुमार (हिमाचल प्रदेश) व दीपक कुमार (राजस्थान), ९२ किलो- बलवीरसिंग (हिमाचल प्रदेश) व अरूण गौड (हरियाणा), ९७ किलो- अमोल गवळी (महावितरण) व मदन (हरियाणा), १२५ किलो- विजेंदरसिंग (हिमाचल प्रदेश) व प्रमोद ढेरे (महावितरण).
यानंतर महावितरण विरुद्ध हरियाणा पॉवर संघामध्ये खो-खोची अंतिम लढत झाली. यात भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर याच्यासह निशिकांत शिंदे, विराज कोटमकर, महेंद्र पाटील यांनी महावितरणच्या आक्रमण व संरक्षणामध्ये आक्रमकता कायम ठेवली आणि हरियाणा पॉवर संघाचा दोन गुण आणि एक डाव राखून एकतर्फी विजय मिळवला. कबड्डीमध्ये महावितरणने अंतिम फेरीत प्रवेश केला असून तुल्यबळ व मागील विजेता हिमाचल प्रदेशशी लढत होणार आहे. महावितरणने बीएसईएस दिल्ली संघाचा ३६ विरुद्ध १० असा एकतर्फी पराभव करीत अंतिम फेरी गाठली. तर हिमाचल प्रदेशने हरियाणा पॉवर संघाचा ४८ विरुद्ध २८ असा पराभव करीत अंतिम फेरीमध्ये महावितरणला आव्हान दिले आहे.
बास्केटबॉलच्या अंतिम सामन्यात पंजाब संघाने (४५) हरियाणा संघाला (३०) १५ गुणांनी विजय मिळवत स्पर्धेतील विजेतेपद मिळवले. पंजाबकडून हरप्रित सिंग यांनी संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर तृतीय स्थानासाठी अत्यंत चुरशीच्या व शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा निर्माण झालेल्या बास्केटबॉलच्या लढतीत महावितरण संघाने (२३) राजस्थान संघाचा (२१) केवळ २ गुणांनी पराभव केला. महावितरणकडून भारत मराठे यांनी शेवटच्या क्षणाला दोन गुणांची कमाई करीत संघाला विजयी केले. या लढतीत कृष्णा लाड, किशोर सपकाळे यांनीही चमकदार कामगिरी केली.























































