देशाच्या विविध शहरांमध्ये पंचतारांकित हॉटेल्स चालवणाऱ्या कंपन्यांनी महाविद्यालयाच्या 43 विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड
कोल्हापूर – डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीच्या (हॉटेल मॅनेजमेंट) द्वितीय वर्षात शिकणाऱ्या 43 विद्यार्थ्यांची नामांकित हॉटेलमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झाली. विविध हॉटेल व्यवस्थापनाकडून मुलाखतीद्वारे ही निवड करण्यात आली. सदरचे प्रशिक्षण हे चार महिन्याकरिता असून या काळात विद्यार्थ्यांना हॉटेल्समधील सर्व विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे.
डी. वाय. पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटीतर्फे बी. एस्सी. इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज् हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम घेण्यात येतो. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रात्यक्षिक ज्ञान मिळावे यावर महाविद्यालयातर्फे भर दिला जातो. त्यासाठी विविध पंचतारांकित हॉटेलमध्ये प्रात्यक्षिक कामाचा अनुभव घेण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाते. देशाच्या विविध शहरांमध्ये पंचतारांकित हॉटेल्स चालवणाऱ्या कंपन्यांनी महाविद्यालयाच्या 43 विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड केली आहे. यामध्ये गोवा, मुंबई , पुणे, कोल्हापूर, बेळगाव मधील डब्लू , सयाजी हॉटेल , हिल्टन गार्डेन,द वेस्टीन, फेयर फिल्ड बाय म्यारीट आदी हॉटेल्समध्ये विद्यार्थ्याना प्रशिक्षणाची संधी मिळाली आहे.
या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य रुधीर बारदेस्कर, ट्रेनिंग व प्लेसमेंट ऑफिसर सुरज यादव यांचे मार्गदर्शन लाभले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.

















































