जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची मजरे कासारवाडा ग्रामपंचायतीला भेट; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची घेतली सविस्तर माहिती

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

विकास कामांचा आढावा घेत कामांची गुणवत्ता राखत वेळेत पूर्ण करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना

तुरंबे (विनायक जितकर) – ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा ग्रामपंचायतीला भेट देत विविध विकासकामांची पाहणी केली. त्यांच्या भेटीमुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. यामुळे अभियानाला अधिक गती निर्माण होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली. पाणीपुरवठा, स्वच्छता, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक सुविधा आदी कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. कामांची गुणवत्ता राखत वेळेत पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला. यावेळी लोकसहभागातून गावात जेष्ठ नागरिकांना बसण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या लोखंडी बाकड्यांचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते संपन्न झाला. या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांचे त्यांनी कौतुक केले व सामाजिक बांधिलकीची ही चांगली परंपरा असल्याचे नमूद केले. तसेच गावातील प्राथमिक शाळेला भेट देत शैक्षणिक सुविधांची पाहणी करण्यात आली. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या प्रगतीची माहिती घेतली. यासोबतच सुरू असलेल्या स्मार्ट अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाचीही त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, ‘सूर्यघर’ योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पाचीही त्यांनी पाहणी करून नागरिकांना मिळणाऱ्या लाभांची माहिती घेतली. यांचबरोबर माझे गाव आरोग्य संपन्न गाव या योजनेमध्ये मजरे कासारवाडा या गावाने राज्यात प्रभावी काम करावे अशी आशा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

या भेटीदरम्यान प्रांत अधिकारी प्रसाद चौगले, तहसीलदार अनिता देशमुख, गटविकास अधिकारी अविनाश मेश्राम, सहाय्यक गट विकास अधिकारी अविनाश कामत, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी संतोष वरपे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता मुजामील नावळेकर, शुभम निर्मळे, मंडल अधिकारी प्रवीण पाटील, अंगणवाडी पर्यवेक्षिका धनश्री पारकर ग्रामपंचायत अधिकारी सचिन बारड, सरपंच योगिता वारके, उपसरपंच विक्रम वारके, युवराज वारके, सचिन वारके, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे गावातील विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.