POSITIVVE WATCH TEAM
मुंबई- “बाळासाहेब तसे पाहिले तर राजकारणी नव्हते. त्यांचे जीवन खुल्या पुस्तकासारखे आहे. जे पोटात, तेच ओठात अशाप्रकारे त्यांचे वागणे होते. त्यात कोणतीही मोडतोड करता कामा नये. स्व. बाळासाहेब हिंदूहृदयसम्राट होते त्यासोबतच ते मैत्रीसम्राट, नेतृत्वसम्राट, कलासम्राट, चक्रवर्ती सम्राट होते. व्यवहारापलीकडे जाऊन त्यांनी मैत्री केली. राजकीय फायद्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी मैत्री जपली. बाळासाहेबांनी जे काम केले ते जसेच्या तसेच पुढच्या पिढीसमोर ठेवले पाहीजे.
”स्व. बाळासाहेब ठाकरे हिंदूहृदयसम्राट आहेतच, त्याबद्दल कुणाच्याच मनात शंका नाही. पण ते हिंदू धार्जिणे होते, हे अर्धसत्य आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ जयंतीनिमित्त विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहातील बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यात सरकारच्यावतीने अनेकांची भाषणे झाले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे देखील यावेळी भाषण झाले. त्यावेळी ते बाेलत हाेते.
बाळासाहेबांना हिंदू, मुस्लीम, शीख, बौद्ध, जैन अशा सर्व धर्मीयांबद्दल आस्था आणि आदर होता. १९७२-७३ मध्ये शिवसेनेने रा.सु. गवई यांच्याबरोबर युती केली होती. मुंबई महानगरपालिकेत जागा कमी पडल्या असता मुस्लीम लीगचाही पाठिंबा घेतला होता. सुधीर जोशींना महापौर केले होते. भीमशक्ती-शिवशक्तीला एकत्र आणण्याचे काम बाळासाहेबांनी केले होते. आणीबाणीच्या काळात शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला होता.”
पवार म्हणाले की, बाळासाहेबांचे विचार पुढे नेत असल्याचा दावा करत असताना जे पोटात, तेच ओठात, बोलणं एक आणि करणं एक, असे न करता बाळासाहेबांचे हे गुण आत्मसात आणण्याचा प्रयत्न आपण केला पाहीजे, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली. तसेच या तैलचित्रावर असलेल्या हिंदूहृदयसम्राट या उल्लेखावर आक्षेप घेत तिथे शिवसेना पक्षप्रमुख हिंदूहृसम्राट असा उल्लेख असावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली.