विनायक जितकर
कोल्हापूर महापालिका सलग दोन वर्ष वसुलीमध्ये अव्वल स्थानावर…
कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर महानगरपालिकेने पाणीपट्टी वसुलीमध्ये राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. कोल्हापूर महापालिकेला सलग दोन वर्ष आपले स्थान टिकवून ठेवण्यात यश मिळाले आहे. कोल्हापूर महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था असल्याने मिळणाऱ्या उत्पन्नावर खर्च जाऊन शिल्लक रकमेवर विकास कामे केली जातात. घरफाळा, नगररचना,इस्टेटसह आदी विभाग उत्पन्न मिळवून देणार आहेत. यामध्ये पाणीपुरवठा विभागातून उत्पन्न मिळते. परंतु हा विभाग पाटबंधारे विभागाकडून पाणी विकत घेऊन “ना नफा – ना तोटा” तत्त्वावर शहरात पाणी वितरित करतो. त्यामुळे शहरातील नळ कनेक्शन धारकांनी पाणीपट्टी वेळेवर भरून सहकार्य करणे अपेक्षित असते. तरीसुद्धा शंभर टक्के पाणीपट्टी वसुली होत नाही, हे सुद्धा नाकारता येत नाही.
महापूर,कोरोना यामुळे वसुलीवर परिणाम झाला.या आर्थिक वर्षात उद्दिष्टांपैकी 65 टक्क्यांवर वसुली झाली आहे. कोल्हापूर महापालिकेच्या दृष्टीने ही वसुली कमी होत असली तरी राज्यातील इतर पालिकेच्या तुलनेत कोल्हापूर महापालिकेची वसुली चांगली आहे. त्यामुळे राज्य शासनाच्या नगरविकास, विभागाने राज्यातील महापालिका, नगरपालिका पाणीपट्टींच्या वसुलीचे उद्दिष्ट आणि झालेली वसुलीची माहिती ऑनलाईन सबमिट करण्याच्या सूचना केल्या होत्या.त्यानुसार 21 महापालिकेने माहिती दिली. या यादीनुसार कोल्हापूर महापालिकाने सलग दोन वर्ष वसुलीमध्ये अव्वल स्थान प्राप्त केले आहे.