नवी दिल्ली : ‘ दोन वर्षांपूर्वी लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न हाणून पाडल्यानंतरही, ९ डिसेंबर रोजी अरुणाचल प्रदेशमधील तवांग परिसरात चिनी सैनिकांनी पुन्हा भारताची कुरापत काढली. प्रत्यक्ष ताबारेषा ओलांडून आलेल्या चिनी सैनिकांना भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.
‘घटनेनंतर ११ डिसेंबर रोजी तिथे तैनात असलेल्या भारत व चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांनी ध्वजबैठक घेऊन चर्चा केली. घुसखोरी न करण्याचा तसेच, तवांगच्या प्रत्यक्ष ताबारेषेवर शांतता राखण्याचा इशारा चीनला देण्यात आला आहे. तसेच, या घटनेची गंभीर दखल घेत भारताने राजनैतिक स्तरावरही नाराजी व्यक्त केली आहे,’ असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.
ईशान्येकडील भागांमध्ये, प्रामुख्याने लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये चीनच्या आक्रमक भूमिकेवरून विरोधकांनी मंगळवारी केंद्र सरकारला जाब विचारला. चीनबाबत केंद्र सरकार मवाळ भूमिका घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत येऊन निवेदन देण्याची मागणी काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी केली. मंगळवारी राजनाथ सिंह यांनी संरक्षण दलाच्या तीनही प्रमुखांच्या बैठकीनंतर लोकसभेत दुपारी बारा वाजता व राज्यसभेत साडेबारा वाजता एक पानी लिखित निवेदन वाचून दाखवले.
मात्र, चिनी घुसखोरीच्या मुद्दय़ावर सभागृहात चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी चर्चेला अनुमती न दिल्यामुळे दोन्ही सभागृहांतील विरोधकांनी सभात्याग केला.
‘अरुणाचल प्रदेशमधील तवांग सेक्टरच्या यांग्त्से परिसरात प्रत्यक्ष ताबारेषेचे उल्लंघन करून घुसखोरीचा चिनी सैनिकांचा प्रयत्न भारताच्या शूर जवानांनी फोल ठरवला. या चकमकीमध्ये दोन्हीकडील सैनिक किरकोळ जखमी झाले. प्राणहानी झालेली नसून, एकही जवान गंभीर जखमी झालेला नाही,’’असे स्पष्टीकरण संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दिले.
राज्यातील सर्वात मोठा समृद्धी महामार्ग, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण