ग्रामस्थांचा एकत्रित प्रयत्न आणि ग्रामपंचायत मजरे कासारवाडा यांनी उचललेले हे पाऊल संपूर्ण तालुक्यासह राज्यासाठी आदर्श ठरेल – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा ग्रामपंचायत मजरे कासारवाडा येथे उत्साहात शुभारंभ

तुरंबे प्रतिनिधी (विनायक जितकर) – राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा येथे बुधवार दि. 22 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन नामदार प्रकाश आबिटकर (मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पालकमंत्री कोल्हापूर) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. ए. वाय. पाटील (संचालक, के.डी.सी.सी. बँक, कोल्हापूर) होते. या अभियानांतर्गत वॉटर बेल, ग्रामपंचायत अ‍ॅप, तसेच प्रधानमंत्री सौरघर ग्राम योजना या उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमास ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, महिला बचतगट, तसेच स्थानिक तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी बोलताना पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर म्हणाले की, “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे केवळ शासनाचे उपक्रम नसून, गावाच्या सर्वांगीण विकासासाठीचा एक सामूहिक संकल्प आहे. शासनाच्या विविध योजना गावापर्यंत पोहोचविण्यासाठी, त्या प्रभावीपणे राबविण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाला त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी ग्रामसेवक व ग्रामपंचायत हीच खरी आधारभूत शक्ती आहे. ते पुढे म्हणाले, मजरे कासारवाडा ग्रामपंचायतीने लोकसहभागाच्या माध्यमातून आणि लोकवर्गणीच्या आधारे विकासकामांना गती देण्याचा घेतलेला उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. शासन कितीही योजना आखो, परंतु त्या योजनांच्या यशामागे ग्रामस्थांचा विश्वास, सहभाग आणि श्रमदान हे घटक सर्वात महत्त्वाचे ठरतात. ग्रामविकास म्हणजे फक्त इमारती किंवा रस्ते नव्हे, तर तो एक सामाजिक परिवर्तनाचा प्रवास आहे. पालकमंत्री आबिटकर यांनी असेही सांगितले की, आजच्या काळात ‘स्मार्ट ग्राम’ ही संकल्पना साकार करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर, पारदर्शक प्रशासन आणि लोकशाही सहभाग ही तीन मूलतत्त्वे महत्त्वाची आहेत. ग्रामपंचायत अ‍ॅपच्या माध्यमातून गावातील नागरिकांना माहिती मिळणे सुलभ होईल, तर प्रधानमंत्री सौरघर ग्राम योजनेतून शाश्वत विकासाची पायाभरणी होईल. “गावाचा विकास हा कोणत्याही एका व्यक्तीचा नव्हे, तर सर्व ग्रामस्थांचा एकत्रित प्रयत्न आहे. ग्रामपंचायत मजरे कासारवाडा यांनी उचललेले हे पाऊल संपूर्ण तालुक्यासह राज्यासाठी आदर्श ठरेल, असा मला विश्वास आहे.

यावेळी मा. ए. वाय. पाटील यांनी ग्रामस्थांशी संवाद साधताना सांगितले की, “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून शासनाने गावागावात विकासाची नवी ऊर्जा निर्माण केली आहे. मात्र, या योजनेचा खरा आत्मा तेव्हाच साकार होतो, जेव्हा ग्रामस्थ स्वतः पुढाकार घेऊन विकासकामांना हातभार लावतात. मजरे कासारवाडा ग्रामपंचायतीने लोकवर्गणीच्या माध्यमातून घेतलेली ही पुढाकारपद्धत खरोखरच प्रेरणादायी आहे.” ते पुढे म्हणाले, गावाचा विकास म्हणजे फक्त निधी नव्हे, तर दृष्टी, नेतृत्व आणि सहभाग या तीन गोष्टींचा सुंदर संगम. मजरे कासारवाडा येथे ग्रामस्थांनी दाखवलेले एकोपा आणि सहकार्य हे इतर गावांसाठी आदर्श ठरावे. आजच्या काळात जलव्यवस्थापन, स्वच्छता, डिजिटल ग्रामपंचायत, आणि आत्मनिर्भर ग्रामरचना या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ग्रामपातळीवर नियोजन आणि एकजूट आवश्यक आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साताप्पा शेरवाडे यांनी केले तर प्रस्ताविक प्रमोद तौंदकर यांनी केले. आभार ग्रामसेवक सचिन बारड यांनी मानले, यावेळी सरपंच, उपसरपंच यांच्यासह उपस्थित तरुण, महिला आणि ग्रामस्थांच्या सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक झाला.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.