कृतज्ञता पर्व मध्ये माती शिल्पकला शिबीर संपन्न
कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व अंतर्गत शाहू मिलमध्ये झालेल्या माती – शिल्प कला प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांनी मातीपासून विविध आकारांची शिल्पे साकारण्याचा आनंद लुटला. युवा शिल्पकार सत्यजित निगवेकर यांनी घेतलेल्या शिल्प कौशल्यांबाबतच्या कृती शिबीरात मुले दंग होवून गेली.
यावेळी श्री निगवेकर यांनी मातीचे व शिल्पाचे प्रकार व माहिती सांगून मोर, फुले, नाग, ससा, कासव अशा वेगवेगळ्या आकारांची सुंदर शिल्पे मुलांकडून तयार करवून घेतली. सुप्रिया निगवेकर, चेतन चौगले, सर्जेराव कांबळे प्रकाश व्हरांबळे यांनी यासाठी सहकार्य केले. तर कार्यशाळेचे नियोजन प्राचार्य अजेय दळवी, प्रमोद पाटील, उदय गायकवाड, आदित्य बेडेकर यांनी केले.
पालकांनीही लुटला शिल्पकलेचा आनंद शिल्पकलेच्या कार्यशाळेत मुलांबरोबरच त्यांच्यासोबत आलेल्या पालकांनीही शिल्पकलेच्या विविध प्रतिकृती बनवण्याचा आनंद लुटला. ही कला शिकवण्यासाठी काही पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रशिक्षकांना विनंती केली. विद्यार्थ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम श्री शाहू छत्रपती मिलमध्ये इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दि. 11 मे रोजी सकाळी 10.30 ते 12.30 यावेळेत गौरव काइंगडे यांची मातीकाम (पॉटरी) बद्दल प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात येणार आहे. शुक्रवार दि. 12 मे रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी चेतन चौगुले यांची चित्ररेखांकन आणि रंगकाम कार्यशाळा होणार आहे. तर शनिवार 13 मे रोजी भाऊसो पाटील यांचे ऍनिमेशन आणि कार्टून फिल्म निर्मिती आणि त्यातील चित्रकलेचे योगदान याबद्दल प्राथमिक माहिती कार्यशाळा घेण्यात येणार असून विनामूल्य असणाऱ्या या सर्व उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. |