गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेबाबत आवाहन
कोल्हापूर : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या बदललेल्या स्वरुपानुसार अपघातग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांना स्थानिक तालुका पातळीवर सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. दि. 19 एप्रिल 2023 नंतर या योजनेमध्ये समावेश असणा-यांचा अपघातामुळे मृत्यू ओढावला अथवा कोणत्याही प्रकारचे अपंगत्व आल्यास गावपातळीवरील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी केले आहे.
सन 2021-22 करिता या योजनेचा कालावधी 7 एप्रिल 2021 ते 6 एप्रिल 2022 असा होता. त्यानंतच्या कालावधीमध्ये ही योजना पुढे सुरु ठेवण्यात आली नव्हती. परंतु, शासनाने विशेष बाब म्हणून दिनांक 7 एप्रिल 2022 ते 22 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये झालेल्या अपघातासाठी मान्यता दिली आहे. या कालावधीमध्ये जिल्ह्यातील 106 विमा दावे प्राप्त झाले आहेत. त्यापैकी मंजूर झालेल्या 44 विमा दाव्यांना मार्च 2023 मध्ये 87 लाख रुपये अनुदान वितरीत केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृषी कार्यालय 0231-2654603 दूरध्वनीवर संपर्क साधावा, असेही श्री. दिवेकर यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.