राज्याच्या मुख्यमंत्री आणि मुख सचिवांना पत्राद्वारे केली विनंती…
मुंबई : महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अजरामर ठरलेल्या आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी हुतात्मा झालेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मारक मुंबईमध्ये १९६१ पासून आहे. फाउंटन येथे दिमाखात उभ्या असलेल्या या स्मारकाच्या रूपाने हा सर्व लढा इतिहासाची कायमस्वरूपी प्रेरणा देत आहे. या हुतात्म्यांच्या स्मारकाच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महादेव गोविंद उर्फ भाऊ सावंत यांनी केलेली आहे. सन २००४ मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारकडून केंद्र सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाकडे प्रस्ताव दिला होता. पण यावर अजूनही कोणताही निर्णय झालेला नाही.
हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करून घेण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने पाठपुरावा करण्यात यावा. हे टपाल तिकीट लवकरात लवकर प्रकाशित करण्याबद्दल राज्य सरकारच्या पातळीवरून कार्यवाही करण्याची विनंतीवजा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.
महाराष्ट्र दिनी हुतात्मा स्मारकाजवळ सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. गोऱ्हे यांच्याकडे याबाबत राज्य सरकारने पुढाकार घेण्याबाबत विनंती केली होती. केंद्र सरकारने “मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र लढयाचा इतिहास असणाऱ्या हुतात्मा स्मारकावर टपाल तिकीट प्रकाशित करावे” ही मागणी सन १९९९ पासून होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य सचिव मनोज सौनिक यांना डॉ. गोऱ्हे यांनी आज पत्र दिले आहे.