गावाचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास :अरुण माळी
नागाव (प्रतिनिधी) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त पंचशील तरुण मंडळ, इंदिरानगर नागाव यांच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर शिरोली जिल्हा परिषद सदस्य सलीम महात यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष प्रवीण आठवले यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच नागाव पंचायत समिती सदस्य अरुण माळी यांचा सत्कार सिद्धार्थ आठवले यांनी केला, तर शिरोली पंचायत समिती सदस्या कमल यांचा सत्कार मंडळाच्या सदस्या दिपाली आठवले यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी मान्यवरांच्या भाषणांचा कार्यक्रम झाला. आपल्या मनोगतात अरुण माळी यांनी “गावाचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास आहे” असे सांगत इंदिरानगर परिसरातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला. इतर मान्यवरांनीही सामाजिक एकजूट व विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास युवा नेते विजय पाटील, कुमार राठोड, ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच भीमराव खाडे, प्रकाश कौंदाडे, तसेच विकास आठवले, प्रदीप आठवले, प्रकाश आठवले, संदीप कांबळे, विजय आठवले, संभाजी कांबळे यांसह मंडळाचे पदाधिकारी व महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन उत्तम पद्धतीने पार पडले. शेवटी विकास आठवले यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.























































