‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी’ उपक्रमातून धामोडमध्ये विद्यार्थी व शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतील उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; रेशीम शेती, मृदा आरोग्य व डिजिटल कृषी तंत्रज्ञानाची माहिती

राधानगरी – महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारा “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” हा उपक्रम सोमवारी मौजे धामोड (ता. राधानगरी) येथे उत्साहात पार पडला.

धामोड येथील तुती प्लॉट व भात पिकाच्या प्रक्षेत्रावर आयोजित या कार्यक्रमात शेतकरी बांधवांना आधुनिक, शाश्वत व तंत्रज्ञानाधारित शेतीविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मृदा आरोग्य पत्रिकेच्या आधारे संतुलित खतांचा वापर, FFS ॲपच्या माध्यमातून ऑनलाइन खत बुकिंगची सुविधा, शेतीमध्ये महाविस्तार एआय ॲपचा प्रभावी वापर, तसेच तुती लागवडीचे तंत्र, व्यवस्थापन आणि रेशीम शेतीचे महत्त्व याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली.

यावेळी लोकनेते आण्णासाहेब नवने माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष शेतात नेऊन रेशीम शेतीची संपूर्ण प्रक्रिया, तुती लागवडीचे महत्त्व आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील नव्या संधींची माहिती मिळाली. कार्यक्रमात कृषी विभागीय कार्यालयाचे समन्वय अधिकारी श्री. रविंद्र जांभुळकर (RIU, कोल्हापूर), कृषी अधिकारी श्री. अमोल डांगे, सहाय्यक कृषी अधिकारी श्री. उमेश नाधवडेकर यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देत शासनाच्या कृषी योजनांची माहिती दिली.

या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे मा. सरपंच, मा. उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, केंद्र शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, परिसरातील शेतकरी बांधव, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यात आधुनिक कृषी तंत्रज्ञानाबाबत जागरूकता निर्माण करणारा ठरत असून, शेती अधिक उत्पादनक्षम व तंत्रज्ञानस्नेही करण्याच्या दिशेने तो महत्त्वपूर्ण पाऊल असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.