विनायक जितकर
दुधगंगा नदीच्या काठावर हिरव्यागार निसर्गरम्य वनराईत नटलेली, अनेक देवदेवतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली स्वछ, सुंदर व समृध्द अशी नगरी म्हणजे मजरे कासारवाडा होय.
मजरे कासारवाडा ता. राधानगरी या नगरीच्या मध्यावर असलेल मनमोहक मंदिर म्हणजे येथील ग्रामदेवता काळम्मादेवीचे मंदीर होय. हे एक जागृत देवस्थान असून प्रतिवर्षी हजारो भावीक या देवीच्या दर्शनासाठी येतात. नवसाला पावणरी देवी म्हणून या देवीची महती आहे. या देवाच्या मंदिरासमोर प्रशस्त असे पटांगण आहे. या देवाचा नवरात्र उत्सव मोठया उत्साहात पालखी काढून साजरा होतो. या उत्साहाच्या कालावधीत मंदिरावर सुंदर अशी रोशणाई केली जाते. देवीच्या मंदिरा समोर हालगी करंडयांच्या वाद्यावर निशाणकाठ्या नाचवल्या जातात. विजया दशमी दसऱ्याच्या दिवशी ज्यांचा नवस पूर्ण झालेला आहे. अशा व्यक्ती नारळाची भकले आकाशात उंचावरती भिरकवतात व बकीचे भक्त ती भकले देवीचा प्रसाद म्हणून झेलतात. व दसरा उत्सव आनंदाने साजरा करतात.
या देवीच्या बाबतीत अशी एक अख्यायिका आहे की पूर्वी दरोडेखोर घोडयावरुन यायचे व गावात लूटमार करायचे तेंव्हा दरोडेखोरांना कसे रोखयचे हा गावकऱ्यापूढे प्रश्न होता. तेव्हा देवीचा एक निस्सिम भक्त मंदिरात देवी समोर गेला त्याने मुठभर तांदूळ देवी समोर उधळले तेव्हा त्या तांदळाचे मोठ-मोठया भुंग्यात रुपांतर झाले. त्या भुंग्यांनी दरोडखोरांचा पाठलाग केला व चावा घेतला. घोडयावरून आलेले दरोडेखोर घाबरून पळून गेले व त्यानंतर ते कधी मजरे कासारवाडा नगरीकडे परतले नाहीत. त्यानंतर देवीचे महती वाढत गेले. सदर देवीची विधिवत पूजा ग्रामस्थांनी सातत्याने सुरु ठेवली व पुढे ही देवता ग्रामदेवता म्हणून प्रसिध्दीस आली.
नाईकबा मंदिर हे देखील जागृत देवस्थान आहे हे कराड बनपुरी येथील नाईकबा मंदिराची प्रतिकृती आहे मजरे कासारवाडा येथील नाईकबा यात्रा कराड येथील बनपुरी नाईकबा यात्रेबरोबरच केली जाते. या वेळी गावामध्ये श्री काळम्मादेवी व नाईकबा देवाची विधिवत पूजा करून यात्रेची सुरवात होते.