40 कि.मी. रस्त्यांसाठी 65 कोटी 82 लाख रुपयांचा निधी मंजूर…
गारगोटी प्रतिनिधी – राधानगरी विधानसभा मतदार संघातील राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा – २ अंतर्गत 39.07 कि.मी. रस्त्यांच्या दर्जा उन्नतीसाठी 65 कोटी 82 लाख रुपये मंजूर झाले असून सदरचे रस्ते हे आर.सी.सी.काँक्रेटचे करण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आबिटकर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.
प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, राज्यांत पहिल्यांदास मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेले रस्ते हे आर.सी.सी. (सिमेंट) चे होणार आहेत. यामुळे रत्यांचा दर्जा सुधारणार असून जास्त काळ टिकणार देखील आहेत. यापूर्वीही राज्य शासनाच्या विविध विकासाभिमुख योजनांतून राधानगरी, भुदरगड व आजरा तालुक्यातील विविध रस्ते सुधारणा आणि बांधणीसाठी भरघोस निधी प्राप्त झाला आहे. मतदारसंघाच्या धोरणात्मक प्रगतीसाठी आणि पायाभूत विकासासाठी केंद्रस्थानी असणाऱ्या रस्ते विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे. मतदार संघातील प्रत्येक गावाचा समतोल आणि व्यापक पद्धतीने विकास व्हावा याकडे आपले वैयक्तिक लक्ष असून यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू देणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
यामध्ये राधानगरी तालुक्यातील धामोड मरगुबाई मंदीर सह्याद्री साखर कारखाना ते चांदे रस्ता 4.900 कि.मी. 8 कोटी 58 लाख, आपटाळ ते धुमाळवाडी तळगांव रस्ता 5.900 कि.मी. 10 कोटी 1 लाख या कामांचा समावेश आहे. आजरा तालुक्यातील गवसे ते दाभिल रस्ता 6.100 कि.मी. 10 कोटी 37 लाख कामाचा समावेश आहे. भुदरगड तालुक्यातील गिरगांव ते मिणचे बुद्रुक रस्ता 6.500 कि.मी. 8 कोटी 98 लाख, कडगांव ते वेसर्डे रस्ता 4.570 कि.मी. 8 कोटी 80 लाख, पुष्पनगर फाटा ते कल्याणकरवाडी खेगडेवाडी पाल रस्ता 5.650 कि.मी. 8 कोटी 94 लाख, पिंपळगाव ते दिंडेवाडी (झुलपेवाडी) रस्ता 2.250 कि.मी. 3 कोटी 38 लाख, कुर ते टिक्केवाडी रस्ता 3.600 कि.मी. 6 कोटी 75 लाख आदी कामांचा समावेश आहे.
राधानगरी विधानसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी मोठ्या रक्कमेचा निधी उपलब्ध करून दिलेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे सहकार्य लाभले असल्याचे म्हटले आहे.