विनायक जितकर
प्रवाशांना योग्य सुविधा देण्याची सूचना अधिकाऱ्यांसमवेत विमानतळाची केली पाहणी…
कोल्हापूर – आमदार ऋतुराज पाटील यांनी शुक्रवारी भारतीय विमानतळ प्राधिकरण अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन कोल्हापूर विमानतळाची पाहणी केली. यावेळी नवीन टर्मिनलचे बांधकाम या सप्टेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी आमदार पाटील यांना दिली. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन योग्य सुविधा निर्माण कराव्यात अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी केल्या.
कोल्हापूर विमानतळ सल्लागार समितीच्या वर्ष 2023 च्या या प्रथम सत्र बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रेखावर हे ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते. या बैठकीत न्यू टर्मिनल बिल्डिंग, नेव्हिगेशन डिव्हीओआर, 64 एकर जमीन अधिग्रहण, फ्लाईट कनेक्टिव्हिटी, सिक्युरिटी, वैद्यकीय सुविधा, पावर ग्रीड लाईन, कचऱ्याची समस्या, विमानतळातील परिसरात कुत्र्यांचा उच्छाद, केएमटी बस सेवा, स्ट्रीट लाईट या विषयांवर सविस्तर चर्चा झाली. कोल्हापूर एअरपोर्ट डायरेक्टर यांनी या संबंधी संपूर्ण माहित बैठकीत दिली. टर्मिनलचे 75 टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
जमीन अधिग्रहणासाठी स्वतंत्र अधिकारी नियुक्त करा.
सध्या महिन्याला चार नाईट लँडिंग सुरू आहेत. कोल्हापूर विमानतळास डिव्हिओआर उपकरणाची गरज आहे. यामुळे एअर ट्राफिक हॅण्डलिंग क्षमता वाढणार आहे. यासाठी जमीन अधिग्रहण सुरु आहे. मात्र त्यात अडचणी येत असल्याने स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करून त्यांना याची जबाबदारी देण्यात यावी, अशी सूचना आमदार पाटील यांनी केली. यासह इंडिगो एअरलाईन्स व स्टार एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांना कनेक्टिव्हीटी वाढवण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी आवश्यक मदत देण्यास प्रयन्तशील राहू अशी ग्वाही त्यांनी दिली. त्याचबरोबर वैद्यकीय सुविधेसाठी डी.वाय.पाटील हॉस्पिटलकडून लागेल ती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पॉवर ग्रीड, स्ट्रीट लाईट, घनकचरा व्यवस्थापन या संबंधी त्यांनी सूचना केल्या.
या बैठकीनंतर त्यांनी न्यू टर्मिनल बांधकामाची पाहणी केली. या ठिकाणचे ७५ टक्के काम पूर्ण झालं आहे. सध्या फक्त फॅब्रिकेशन, ग्लास वर्क सुरु आहे. या ठिकाणी सर्व गोष्टी भविष्याचा विचार करून आणि प्रवाशांना कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नयेत या पद्धतीने करा अशा सूचना त्यांनी दिल्या. यावेळी एअरपोर्ट डायरेक्टर अनिल शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, पोलीस निरीक्षक राजेंद्र माने, चीप ऑफ एअरपोर्ट सिक्युरिटी ऑफिसर राजेंद्र मस्के, इंडिगो एअरलाइन्सचे विशाल भार्गव, स्टार एअरलाइन्सचे नंदकुमार गुरव यासह विमानतळ प्राधिकरणचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.