विनायक जितकर
पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…
कोल्हापूर – जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये उद्भवत असलेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी धरणांमधील उर्वरित पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे. तसेच आवश्यक ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार सतेज उर्फ बंटी डी. पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोसमी पावसाची सुरुवात प्रतिवर्षी जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होत असते. परंतु यावर्षी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हवामान खात्याच्या अंदाजानुसार मोसमी पावसाची सुरुवात 23 जून नंतर होण्याची शक्यता आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात असणाऱ्या धरणांच्या पाणी पातळीमध्ये मोठी घट झाली असल्याने शेतीला पाणी उपसा बंदी मुळे पिकांवर परिणाम होत आहे. तसेच ग्रामीण व शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे धरणांमध्ये शिल्लक असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील विविध ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे व शेतीला पाणी देणे संदर्भात नियोजन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
तरी कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामध्ये उद्भवत असलेल्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी धरणांमधील उर्वरित पाणीसाठ्याचे योग्य नियोजनाबरोबरच आवश्यक असणाऱ्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश द्यावेत व त्याविषयीची माहिती सर्व नागरिकांना ज्ञात करावी, अशी विनंती आमदार पाटील यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.