निसर्गाच्या सानिध्यात अक्षरांचे मैत्र! ‘वाचू आनंदाने’ उपक्रमाने चिपळूणमध्ये रंगला वाचनसोहळा
चिपळूण |शेखर धोंगडे
चिपळूण नगर परिषदेच्या वतीने, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘वाचू आनंदाने’ या उपक्रमाचा दुसरा रविवार अक्षरशः एक वाचनसोहळा ठरला. शहरातील साने गुरुजी उद्यानात सकाळी बरोबर आठ वाजता सुरू झालेल्या या उपक्रमात लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व वयोगटातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
निसर्गाच्या सानिध्यात, हिरवाईच्या कुशीत, पुस्तके हातात घेऊन निवांत वाचनाचा आनंद घेण्याचा हा अनोखा अनुभव दीड तास वाचन व अर्धा तास कविसंवादाच्या माध्यमातून समृद्ध झाला. ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांच्या काव्यवाचनाने वातावरण भारावून गेले.
‘वाचू आनंदाने’ हा उपक्रम मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्याबरोबरच, नागरिकांमध्ये वाचनसंस्कृती रुजवण्याच्या हेतूने दर रविवारी सकाळी ८ ते १० या वेळेत शहरातील विविध उद्यानांमध्ये राबवला जातो. या आठवड्यात साने गुरुजी उद्यानात पार पडलेल्या सत्रात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.
उपस्थित मान्यवरांमध्ये
प्रांताधिकारी आकाश लिगाडे, साहित्यिक प्रकाश देशपांडे, पत्रकार योगेश बांडागळे, उद्योजक रामशेठ रेडीज, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, उद्यानप्रमुख बापू साडविलकर, आरोग्य निरीक्षक सुजित आणि वैभव जाधव, नगर अभियंता दीपक निंबाळकर, कवी अरुण इंगवले, विनायक ओक, संचालक प्रदीप पवार, प्राची जोशी, शिक्षक समीर कोवळे, सुहास चव्हाण, मंगेश खेडेकर, लेखिका संगीता लोटे आणि अनेक साहित्यप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या उपक्रमात दोन्ही वाचनालयांनी विविध वयोगटांसाठी पुस्तकांची खास व्यवस्था केली होती. नागरिकांनी उद्यानात विविध ठिकाणी बसून शांतपणे वाचनाचा आनंद घेतला. विशेष क्षण म्हणजे, माजी नगरसेवक रामशेठ रेडीज हे आपल्या नातीसह उपस्थित होते. त्यांनी नातीला पुस्तक वाचून दाखवलेला हृद्य प्रसंग अनेकांनी मोबाईल कॅमेरात टिपून ठेवला.
‘वूमन सपोर्ट वूमन’ संस्थेच्या डॉ. कांचन मदार व त्यांच्या सहकारी महिलांनीही उपक्रमात सहभाग नोंदवला. चर्चेत असलेले लेखिका संगीता लोटे यांचे “इच्छामरण” हे पुस्तक वाचनासाठी ठेवण्यात आले होते. स्वतः लोटेही उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.
वाचनानंतर प्रकाश देशपांडे यांनी कवी माधव यांच्या निवडक कविता सादर करून उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केलं. प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी वाचनसवयीचे महत्त्व सांगत त्या सवयीमुळे होणारा मानसिक सकारात्मक बदल अधोरेखित केला. आरोग्य निरीक्षक सुजित जाधव यांनी स्वतःचे वाचनविषयक अनुभव सांगत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण केली.
कार्यक्रमाचे सुसूत्र संचालन प्राची जोशी यांनी केले, तर प्रदीप पवार (आंबेडकर वाचनालय) यांनी मन:पूर्वक आभार प्रदर्शन केले.
या उपक्रमाची पुढची साप्ताहिक भेट येत्या रविवारी पाग येथील गार्डनमध्ये पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
POSITIVE WATCH च्या नजरेतून
वाचनसंस्कृती ही कोणत्याही समाजाच्या प्रगल्भतेचे प्रतीक असते. चिपळूण नगर परिषदेने ‘वाचू आनंदाने’ उपक्रमातून जो प्रयत्न सुरू केला आहे, तो केवळ एका उपक्रमापुरता मर्यादित न राहता, ही एक सामाजिक चळवळ व्हावी, अशी अपेक्षा आहे. शहराच्या हिरव्या उद्यानांतून, पुस्तकांच्या पानांतून, आणि रसिकांच्या नजरेतून उमटणारा हा सृजनशील आनंद समाजमनात सकारात्मक ऊर्जा भरतो.
आजच्या धावपळीच्या आणि मोबाइलाधारित युगात, वाचनाच्या सवयी लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. अशा वेळी अशा उपक्रमांची गरज केवळ लहानग्यांपुरती नसून, प्रत्येक वयोगटासाठी आहे. “पुस्तकांशी मैत्री” ही केवळ शैक्षणिक गरज नसून, ती भावनिक, बौद्धिक आणि नैतिक समृद्धीचा मार्ग आहे.
प्रशासन, वाचनालये आणि स्थानिक संस्थांच्या पुढाकाराने ही चळवळ अधिक व्यापक होत जावी, शाळा-कॉलेजांसोबतच नागरिकही सहभागी व्हावेत, आणि प्रत्येक रविवारी शहरातील कोणते ना कोणते उद्यान वाचनासाठी ‘पुस्तकांचे देऊळ’ व्हावे, हीच या संपादकीयातूनPOSITIVE WATCH च्या मनापासून शुभेच्छा!
जेष्ठ पत्रकार धनंजय काळे