विनायक जितकर
श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पोटनियमातील तरतुदीनुसार सत्ताधारी गटाकडून हरकती घेण्यात आलेल्या विरोधी गटातील 29 उमेदवार अपात्र ठरले आहेत.
कोल्हापूर : श्री छत्रपती राजाराम साखर कारखाना निवडणुकीत 29 उमेदवार अपात्र ठरविण्याचा झालेला निर्णय हा सहकारातील काळा दिवस ठरला आहे. सर्व गटात आमच्या परिवर्तन पॅनेलचे उमेदवार आहेत. कोणताही गट बिनविरोध होणार नाही. तसेच 29 उमेदवार अपात्र ठरविण्याच्या निर्णयाला हाय कोर्टात आव्हान देणार असून आपण थांबायचे नाही.. आपल ठरलंय.. कंडका पाडायचा ! असा घणाघात आमदार सतेज पाटील यांनी राजाराम कारखाना सभासदांच्या मेळाव्यात केला.
आमदार सतेज पाटील म्हणाले चांगला कारभार केला तर रडीचा डाव का खेळता ? कुस्ती करायची होती मग पळपुटेपणा का करता ? पत्ता कसलाही असुदे.. तुम्ही जोकर टाकलाय पण १२ हजार सभासद हा एक्का माझ्याकडे आहे.
ही लढाई महाडिक आणि बंटी पाटील अशी नाही… तर कोल्हापूरचे १२ हजार सभासद विरुद्ध येलूरचे ६०० सभासद अशी आहे. ही निवडणूक काहीही झाले तरी जिंकायची आहे. यासाठी सभासद नक्की परिवर्तन घडवून आणतील असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.