ग्रामीण रुग्णालयात 2 डी इको कार्डिओग्राफी सेवेचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण
कोल्हापूर – भविष्यात राधानगरी ग्रामीण रुग्णालयात 100 बेडेड ची सोय, तहसील कार्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण, आयुष वेलनेस सेंटर, सोळांकूर रुग्णालयातील अत्याधुनिक सुविधा, अद्ययावत आरोग्य सेवा सुविधांनीयुक्त तारळे उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन सुसज्ज इमारतीचे लोकार्पण आदी विविध विकास कामे आरोग्य विभागाअंतर्गत होत असून भविष्यात राधानगरी मेडिकल व टुरिझम हब बनेल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केला. आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या विकासकामांची माहिती देऊन नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्य संपन्न राज्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
राधानगरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये अत्याधुनिक 2 डी इको कार्डिओग्राफी सेवेचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. दिलीप माने, ट्रायकॉग हेल्थ इंडियाचे संस्थापक कार्डिओलॉजिस्ट डॉ. चरित भोजराज, कुष्ठरोग विभागाच्या सहसंचालक डॉ. हेमलता पालेकर, आरोग्य सेवा विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम.डी. देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, राधानगरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल पाटील, भुदरगडच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. पल्लवी तारळकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र शेटे, पंचायत समिती सभापती आर. वाय. पाटील, राधानगरी पंचायत समितीच्या उपसभापती अश्विनी चौगुले, जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुका अध्यक्ष दीपक शेट्टी तसेच वैद्यकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दर्जेदार आणि मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी राज्य शासन आग्रही आहे. राज्य शासनाच्या विविध योजनांचा व आरोग्य विषयक सेवा सुविधांचा लाभ राज्यासह राधानगरी तालुक्यातील नागरिकांना देण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यातील एक भाग म्हणून ग्रामीण रुग्णालयात 2 डी इको कार्डिओग्राफी सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. विविध आजारांनी त्रस्त असणाऱ्या रुग्णांच्या जीवाला 2 डी इको न झाल्यामुळे धोका पोहोचू शकतो. अशी परिस्थिती उद्भवणाऱ्या रुग्णांना या सेवेसाठी शहरात जावे लागणार नाही. गरजू रुग्णांना राधानगरीमध्येच शासकीय रुग्णालयात या सेवेचा लाभ मिळेल. याबरोबरच या रुग्णालयात 100 बेड ची सुविधा देण्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आला असून लवकरच तो मंजूर होईल. हे रुग्णालय अद्ययावत होण्यासाठी फेस लिफ्टिंगच्या माध्यमातून जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर केला आहे. राधानगरी तालुक्यात आयुष वेलनेस सेंटर उभारण्यात येत असून यामुळे राधानगरी ची वेगळी ओळख निर्माण होईल.
राज्यातील पहिले कॅशलेस हॉस्पिटल कोल्हापुरात सुरु होणार
राज्यातील पहिले कॅशलेस हॉस्पिटल कोल्हापूर जिल्ह्यात लवकरच सुरु होईल. तसेच गारगोटी मध्ये अद्ययावत सुविधांनी परिपूर्ण असे नेत्रालय सुरु होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य संवाद यात्रा आरोग्य विभागाच्या कामातील मैलाचा दगड
आरोग्य संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक भागातील नागरिकांशी संवाद साधून आरोग्यविषयक समस्या जाणून त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाबद्दल ही माहिती घेतली जात आहे. आरोग्याचे काम अजून दर्जेदार व्हावे, नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जात असून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असून आरोग्य संवाद यात्रा आरोग्य विभागाच्या कामासाठी एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राधानगरी तालुका भविष्यात महाराष्ट्राच्या पर्यटनाची नवी ओळख होईल
दाजीपूर अभयारण्यात वाघाचे दर्शन झाले, ही जिल्ह्याच्या पर्यटनाच्या दृष्टीने चांगली बाब आहे. वाघाचे दर्शन होत असणाऱ्या दाजीपूर अभयारण्याला हजारो पर्यटकांनी दररोज भेट द्यावी, यासाठी पर्यटन विकासाच्या दृष्टीने जिल्ह्याला आवश्यक त्या पायाभूत सुविधा देण्यात येत आहेत. महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशात दाजीपूर अभयारण्य आणि राधानगरी तालुका भविष्यात महाराष्ट्राच्या पर्यटनाची नवी ओळख होईल. तसेच राधानगरी परिसरात पर्यटन विकास, आरोग्य सुविधा आणि विविध कामांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधला जात असून यामुळे राधानगरी तालुक्याच्या विकासाचा चेहरा मोहरा बदलेल, असा विश्वास पालकमंत्री श्री. आबिटकर यांनी व्यक्त केला.
संजय गांधी निराधार योजना समितीचे तालुका अध्यक्ष दीपक शेट्टी म्हणाले, राधानगरीतील हे रुग्णालय महामार्गानजीक असल्यामुळे भविष्यात या रुग्णालयाचा विस्तार होऊन अत्याधुनिक सेवा सुविधा देणे गरजेचे आहे.
जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव म्हणाले, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यामुळे या ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक सेवा देण्यात येत असून या सेवांचा लाभ नागरिकांना नक्की होईल.
ट्रायकॉग हेल्थ इंडियाचे संस्थापक कार्डिओलॉजिस्ट डॉ. चरित भोजराज म्हणाले, जगातील सर्व अत्याधुनिक आरोग्य सेवा, सुविधा राज्यभर देण्यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर प्रयत्न करत आहेत. यादृष्टीने केंद्र आणि राज्य शासनातील आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.
प्रस्ताविक अमोल पाटील यांनी केले. सिंचन, शिक्षण आणि सामाजिक न्यायाची शिकवण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिली असून त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन पालकमंत्री प्रकाश आबिटकर वाटचाल करत आहेत. राधानगरी तालुक्यात प्रथमच या रुग्णालयात 2 डी इको कार्डिओग्राफी सेवेची सुरुवात होत आहे. आभा कार्ड काढण्याचे काम सुरू आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना राज्याच्या घराघरात पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे. राधानगरी तालुक्यासह राज्यातील नागरिक आरोग्य विभागाच्या योजनांचा लाभ घेत असून हृदय विकाराच्या अचूक निदानासाठी 2 डी इको कार्डिओग्राफी सेवेचा उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले. आभार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात यांनी मानले.


























