इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय (आयजीजीएच) हे इचलकरंजी शहरासह हातकणंगले व शिराेळ तालुका व नजीकच्या सीमावर्ती भागातील रुग्णांसाठी आधारवड बनलेले आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील आराेग्य सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विविध प्रलंबित प्रस्तावांना गती देण्यासाठी आमदार राहुल प्रकाश आवाडे यांच्या पुढाकाराने सार्वजनिक आराेग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या समवेत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत रुग्णालयातील सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आमदार आवाडे यांच्या माध्यमातून शासनाकडे सादर करण्यात आलेल्या विविध प्रस्तावांवर सकारात्मक चर्चा झाली.

आमदार राहुल आवाडे यांनी अत्यावश्यक सेवा म्हणून रुग्णालयात स्वतंत्र रक्तपेढी सुरू करण्यासह आवश्यक पदनिर्मितीस मंजुरी मिळावी, 300 खाटांच्या श्रेणीवर्धनाच्या अनुषंगाने एसएनसीयू, एनआयसीयू, डीआयसीयू, आयुष, एनसीडी आणि अर्श यांसारख्या अत्यावश्यक आराेग्य सुविधांना मंजुरी मिळावी, हृदयराेग रुग्णांसाठी कॅथलॅब आणि कर्कराेग तपासणीसाठी पेटस्कॅन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली. हे रुग्णालय सर्वसामान्य गाेरगरीबांना माेठा आधार असून याठिकाणी आवश्यक त्या सुविधांची नितांत गरज असल्याचे सांगितले. त्याचबराेबर इचलकरंजीते शासकीय दंत महाविद्यालय सुरू करण्याची गरजही व्यक्त करत काेराेची (ता. हातकणंगले) येथील मंजूर प्राथमिक आराेग्य केंद्रासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी केली.
या सर्व मागण्यांवर आराेग्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत रुग्णांना चांगल्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी आवश्यक त्या प्रशासकीय मान्यता आणि निधी देण्याबाबत संबंधित विभागाला सूचना केल्या. आमदार आवाडे यांच्या पाठपुराव्यातून इचलकरंजी व परिसरातील नागरिकांना लवकरच अद्ययावत वैद्यकीय सेवा उपलब्ध हाेण्याचा मार्ग माेकळा झाला आहे.