GOODNEWS- CRIME राज्य उत्पादन शुल्कची धडक कारवाई; ११.२९ कोटींचा मुद्देमाल जप्त!

गतवर्षीच्या तुलनेत दुपटीची कामगिरी; २,०९६ आरोपींवर कारवाई, १८० वाहने जप्त

कोल्हापूर WATCH TEAM : दिवाळीनिमित्त राज्य उत्पादन शुल्क विभागाने वर्षभरातील कामकाजाचा आढावा मांडला. यंदा अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात विभागाने अधिक तीव्र आणि कठोर कारवाई केली. या मोहिमेत तब्बल ११ कोटी २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गतवर्षी सुमारे ५ कोटी ७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्या तुलनेत यंदाची कारवाई लक्षणीय ठरली आहे. वर्षभरात एकूण २ हजार ९६ आरोपींवर कारवाई करण्यात आली. तसेच २०२५ मध्ये १५८ वाहने जप्त करण्यात आली होती. यंदा ही संख्या वाढून १८० वर पोहोचली आहे.

दारूची अवैध निर्मिती, विक्री आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी विभागाने विशेष लक्ष केंद्रित केले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलण्यात आली. यापुढेही अशा कारवायांमध्ये सातत्य राखले जाणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले.

विभागाच्या कामगिरीबद्दल अधिकारी, कर्मचारी आणि संपूर्ण पथकाचे कौतुक करण्यात आले. पोलीस अधीक्षक स्नेहलता  नरवणे आणि पोलीस उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी ही माहिती दिली.

गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी ‘प्रतिबंधात्मक’ बडगा 

रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर केवळ माल जप्त करून भागणार नाही, तर कायदेशीर फास आवळत विभागाने थेट तडीपार व बंदपत्राचा मार्ग पत्करला आहे.

 दारूबंदी कायद्यानुसार ४६ प्रस्ताव

दारूबंदी कायद्यानुसार प्रतिबंधात्मक कारवाईलाही विभागाने प्राधान्य दिले. याअंतर्गत ४६ बंदपत्र प्रस्ताव सादर करण्यात आले. संबंधित व्यक्तींकडून प्रत्येकी एक लाख रुपयांचा बाँड घेण्याची प्रक्रिया करण्यात आली. भविष्यात पुन्हा कायद्याचे उल्लंघन होऊ नये, यासाठी अशा प्रतिबंधात्मक कारवायांना महत्त्व आहे.

परवाने, व्यवसाय आणि नियंत्रण

जिल्ह्यात बिअरबार व्यवसायात दरवर्षी बदल होत असतात. काही नवीन परवाने दिले जातात, तर काही व्यवसाय बंद होतात. त्यामुळे सुरू असलेले परवाने, बंद झालेले व्यवसाय आणि नवीन परवान्यांवरही विभागाला सातत्याने लक्ष ठेवावे लागते. या पार्श्वभूमीवर कायद्याची अंमलबजावणी आणि अवैध मद्यव्यवसायावरील नियंत्रण ही विभागाची महत्त्वाची जबाबदारी ठरते.