चिपळूण : लोककला, कोकणी खाद्य व कोकणी पर्यटन महोत्सव अवघा झाला एक रंग…!
चिपळूण : चिपळूणात लोककला, कोकणी खाद्य व कोकणी पर्यटन महोत्सवाचा प्रारंभ होतोय. त्याचवेळी चिपळूणसह संपूर्ण कोकणात धवल क्रांतीसाठी विश्वासाने, निश्चयाने वाशिष्ठी प्रकल्पाचाही लोकार्पण सोहळा पार पडत आहे. संगळ्यांचे रंग वेगवेगळे आहेत पण या वैविधेतही प्रादेशिक अभिमान, विकास व उन्नती हा मंत्र घेवून वाटचाल करण्याचे समाऩ सुत्र आहे. इथली लोकधारा, इथली परंपरा, इथली संस्कृती व इथला माणूस टीकला पाहिजे ही प्रामाणिक भावना या दोन्ही कार्यक्रमात आहे. त्यामुळे एक महोत्सव आहे तर दुसरा लोकांच्या जीवनात आणणारा उत्सव आहे. समृध्दी हि विविध अंगानी येत असते, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे दोन्ही कार्यक्रम आहेत.
सध्याचा जमाना इन्स्टंट आहे. सारेच प्रचंड वेगात आहे. त्याला कलाक्षेत्र अपवाद़ नाही. यात प्रचंड स्पर्धा आहे व ती वाढत जाणार. टीव्हीपासून ते सिनेमाच्या पडद्यापर्यंत मनोरजनाची व्याप्ती अधिक वाढलीय. त्यात मग आपल्या मातीतील व मातीशी वीण बांधून राहीलेल्या लोककला कशा टीकणार? त्या आताच्या पिढीपर्यंतत्यासाठीच अशा प्रकारचे महोत्सवांचे आयोजन करणे महत्वाचे ठरते. मोबाईल व इंटरनेट क्रांतीच्या या युगात आपल्या गावातील लोककला हरवू नये किंबुहना ती मोठ्या प्रमाणात प्रसारीत व्हावी यासाठी प्रत्येक कोकणवासियाने प्रयत्न केले पाहिजेत.
गावातील मंडळे, खेळ कंपन्या आपआपल्या परीने या लोककलांचे कार्यक्रम करत असतात. खास करुन जत्रा वा ग्रामीण भागातील सार्वजनिक कार्यक्रमात या कला सादर केल्या जातात. दशावतार, कठपुतळी,जाखडी, तारपा सारख्या मोजक्याच लोककलांना राज्यात कार्यक्रमात स्थान दिले जाते बाकी आपआपल्या गावातच सादर होतात. त्यामुळे या कला काळाच्या ओघात टिकल्या पाहिजेत ही प्रत्येक कोकणवासियाची जबाबदारी आहे.यासाठी या सारखे मोठे स्टेज उपलब्ध करणे हे या कलांना व कलाकारांना नवसंजीवनी देण्यासारखचं आहे. प्रत्येक लोककला ही त्या त्या समाजाची, समुहाची, गावाची सांस्कृतिक, सामाजिक व परंपरेची ओळख असते. दुर्देवाने एखाद्या लोककलेचे अस्तित्व संपते ते फक्त कलेपुरते संपणे नसते तर ती संपूर्ण परंपरा नष्ट होत असते याची जाणीव आपण ठेवली पाहिजे.
या सर्व अर्थाने प्रादेशिक ओळखीचे पर्यटन व इथल्याच निसर्गाच्या सहवासातील खाद्य परंपरा व इथल्या मातीतील अगदी प्युअर लोककला असा त्रिवेणी आविष्कार आपण अनुभवणार आहोत. त्याचबरोबर याच कोकणी मातीचं वैशिष्ट सांगणारी व या मातीशी घट्ट नाळ जोडीत लोकांचे जीवनमान उंचावत पुढे जाणारी वाशिष्ठी नदीच्या नावानेच स्थानिक कोकणच्या जीवनात धवल कांतीतून आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी सज्ज झालेली वाशिष्टी डेअरी प्रोजेक्टही लोकार्पित होतोय. हे एक फार सुंदर, समृध्द व संपन्न करणारे प्युजन आहे. कोकणातील हा अत्यंत महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. हा केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर तरूण वर्गाला रोजगार देणारा प्रकल्प आहे.
प्रसिध्द उद्योजक प्रशांत यादव तसेच प्रकल्पाच्या मुख्य प्रवर्तक स्वप्ना प्रशांत यादव व त्यांच्या टीमने चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन व कोकणातील ज्येष्ट सहकारगुरू सुभाषराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प उभा केला. चिपळूण तालुका हा सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जातेय तसेच हे शहर धवल क्रांतीचे शहर म्हणून नावारूपास आले तर आश्चर्य वाटणार नाही. |
एवढ्या पध्दतीचे काटेकोर, नीटनीटके व अभ्यासपूर्ण व्यवस्थापन या टीमचे आहे. सुजलाम् सफलाम् म्हणजेच समृद्वी ही अशाच प्रकल्पातून येते. शेतकरी व स्थानिक तरूण हा समाधानी व आनंदी राहीला तर तो स्वतःच पुढे येवून सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात पुढे येवून काम करतो म्हणूनच आम्ही म्हणतो की, लोककलांचे, पर्यटनांचे व खाद्य संस्कृतीचे विविध रंग आहेत त्यांना जोडणारा हा धवल क्रांतीचा रंग आहे. या अर्थाने अवघा झाला एक रंग..!