शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
कोल्हापूर प्रतिनिधी – शेतकऱ्यांच्या समस्या प्रत्यक्ष शेतात जाऊन समजून घेण्यासाठी आणि शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ थेट त्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी सोमवार, १३ जुलै रोजी कोल्हापूर जिल्ह्यात “माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी” हा अभिनव आणि लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहे. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला जात असून, संपूर्ण जिल्ह्यातील गावागावांत एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर तो राबविला जाणार आहे.
पालकमंत्री यांनी सांगितले कि या उपक्रमाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतील. समस्यांचे तातडीने निराकरण करण्याबरोबरच विविध शासकीय योजनांची माहिती, तांत्रिक मार्गदर्शन आणि आवश्यक ते सहकार्यही दिले जाणार आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष व सदस्य, पंचायत समितीचे सभापती व सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, प्रगतशील शेतकरी, तसेच आत्मा आणि कृषी सल्लागार समितीचे सदस्य सहभागी होणार आहेत. ग्रामविकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी आणि इतर संबंधित विभागांचे अधिकारी आपल्या-आपल्या योजनांची माहिती शेतकऱ्यांना देणार आहेत.
शेतकरी-प्रशासन संवादाला नवी दिशा
या उपक्रमामुळे शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील संवाद अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. योजनांची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, त्यांच्या समस्या जागेवरच समजून घेता येतील आणि त्यांचे तातडीने निराकरण करण्यास मदत होईल. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर थेट निर्णय
शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, शेतीमालाचे उत्पादन, पाणी, पीकविमा, अनुदान, आधुनिक शेती, प्रक्रिया उद्योग अशा विविध विषयांवर अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी या उपक्रमातून उपलब्ध होणार आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर प्रभावी उपाययोजना आखाव्यात आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास व्हावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व शेतकरी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, युवक, महिला, शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी, तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले आहे.
या उपक्रमात होणार विविध उपक्रम
1) उपक्रमादरम्यान शेतकऱ्यांसाठी विविध योजनांचे मार्गदर्शन आणि लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
2) मागेल त्याला काजू योजनेअंतर्गत १ लाख काजू कलमांचे वाटप व लागवड.
3) पाणी फाउंडेशन व राष्ट्रीय निबिड शेती संकल्पनेबाबत मार्गदर्शन.
4) एल-निनो परिस्थितीमुळे शेतीवर होणाऱ्या परिणामांबाबत उपाययोजनांची माहिती.
5) कृषी पुरस्कारप्राप्त व पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांशी थेट संवाद आणि तंत्रज्ञानाचा प्रसार.
6)महा-डीबीटी पोर्टलद्वारे कृषी अवजारे व विविध अनुदान योजनांची माहिती.
7) कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून डिजिटल शेतीबाबत मार्गदर्शन.
8) खतांची ऑनलाइन बुकिंग, क्यूआर कोडद्वारे खत विक्री आणि Framework for Fertilizer Sale प्रणालीबाबत माहिती.
9) विविध विभागांच्या माध्यमातून ५ लाख वृक्ष लागवडीचा संकल्प.











































































