राजकारणाच्या पलीकडची माणुसकी! बळीराजाच्या बांधावर खासदार धैर्यशील माने यांची साधी दिवाळी; जमिनीवर बसून घेतला झुणका-भाकरीचा आस्वाद

कोल्हापूर | WATCH TEAM
सत्तेचा कोणताही बडेजाव नाही, कोणताही राजेशाही थाट नाही; तर केवळ आपल्या मातीशी आणि कष्टकरी बळीराजाशी जोडलेली अतुट नाळ! हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी यंदाची दिवाळी शहरातील झगमगाटात न घालवता, थेट शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम अशा सोनुर्ले पैकी धोंडेवाडी येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन साजरी केली. एका सामान्य शेतकऱ्याच्या घरात जमिनीवर मांडी घालून बसत, ग्रामस्थांसोबत प्रेमाने झुणका-भाकरीचा आस्वाद घेत त्यांनी साधेपणाचे आणि सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन घडवले.
दुर्गम डोंगराळ भागात राहणाऱ्या कष्टकरी बांधवांच्या सुख-दुःखात सहभागी होण्यासाठी खासदार माने धोंडेवाडीत पोहोचले. लोकप्रतिनिधी आपल्या दारी आल्याचे पाहून ग्रामस्थांचे डोळे पाणावले, तर गावातील महिलांना दिवाळी फराळाचे वाटप करून त्यांनी बळीराजाच्या घरातील दिवाळी खऱ्या अर्थाने गोड केली. राजकारणाच्या पलीकडे जाऊन जपलेला हा स्नेह आणि आपुलकी संपूर्ण गावासाठी अविस्मरणीय ठरली.
आनंदासोबतच समस्यांच्या सोडवणुकीचाही शब्द:
या स्नेहमेळाव्यात ग्रामस्थांनी आपल्या मनातील व्यथाही मांडल्या. गावातील रस्ते, पाणीटंचाई, आरोग्य सुविधा, एसटी बस सेवा, वीजपुरवठा, सातबारा उताऱ्याच्या अडचणी आणि वन्यप्राण्यांचा त्रास यांसारखे मूलभूत प्रश्न त्यांनी खासदारांसमोर ठेवले. शेतकऱ्यांच्या या व्यथा ऐकून घेतानाच, या सर्व प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन पाठपुरावा करण्याची ठोस ग्वाही माने यांनी दिली. तसेच, गावाच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नवीन गाव तलावाचा प्रस्ताव तयार करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या भावस्पर्शी प्रसंगी उपसरपंच बळवंत मुगडे, बाबा लाड, चंद्रकांत मुगडे, अतिश शिंगे, संभाजीराव देसाई, ओमकार चौगुले, दादासाहेब गावडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
📍 समाजमनाला जोडणाऱ्या सकारात्मक बातम्यांसाठी पाहत राहा: पॉझिटिव्ह वॉच (शासन मित्र – पोलीस मित्र – समाज मित्र)