पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.
वर्धापन दिन विशेष-विशेष साैजन्य;किशाेर खाेबरे, जनसंपर्क अधिकारी
महावितरण कंपनीचा 19 वा वर्धापनदिन आहे. गेल्या 18 वर्षातील कंपनीची वाटचाल गौरवास्पद आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची पुनर्रचना होऊन दि.6 जून 2005 रोजी महावितरण, महानिर्मिती व महापारेषण या तीन कंपन्या निर्माण करण्यात आल्या. आजघडीला महावितरण ही देशातील व आशियातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील विद्युत वितरण कंपनी आहे. ग्राहकांना स्वस्त दरात अखंडित व दर्जेदार वीजसेवा देऊन राज्य व देशाच्या शाश्वत विकासात योगदानासाठी महावितरण वचनबध्द आहे.
घरगुती, कृषी, औद्योगिक व इतर वर्गवारीतील तीन कोटीहून अधिक वीजग्राहकांना वीजसेवा पुरविण्याचे कार्य महावितरणकडून अविरतपणे सुरू आहे. चार हजार उपकेंद्रे, आठ लक्ष वितरण रोहित्रे, अकरा लक्ष किलोमीटरच्या वीज वाहिन्या असे पायाभुत सुविधांचे अजस्त्र जाळे राज्यात पसरलेले आहे.राज्यात 81 हजारहून अधिक मनुष्यबळ, 4 प्रादेशिक कार्यालये, 16 परिमंडळ, 44 मंडळ, 144 विभाग, 643 उपविभाग आणि 3800 शाखा कार्यालये असा प्रशासकीय विस्तार आहे. याव्दारे मुंबई शहर वगळता राज्याची विजेची गरज पुर्ण करण्यासाठी महावितरणची यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहे. विजेची उच्चांकी मागणी 25 हजार मेगावॅटच्या घरात पोहचली असून महावितरणने 7 फेब्रुवारी 2024 रोजी 25 हजार 410 मेगावॅटचा विक्रमी वीजपुरवठा केला. आर्थिक वर्ष 2022-23 चा वार्षिक वीजवापर 70 हजार 355 दशलक्ष युनिट होता. तर वार्षिक महसूल एक लक्ष 12 हजार कोटीपर्यंत होता.
महावितरणने जलद, पारदर्शक व प्रभावी ग्राहकसेवेसाठी माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे आधुनिकीकरणाची कास धरली आहे. नुकतेच सुरू झालेले ऊर्जा चॅटबोट तसेच संकेतस्थळ, मोबाईल ॲप, मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे टोल फ्री क्रमांक, एसएमएस, ई-मेल इ.माध्यमातून ग्राहकांना डिजिटल पध्दतीने सर्व सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
कर्मचाऱ्यांनाही डॅशबोर्ड, मोबाईल ॲप, एम्प्लॉई मित्र पोर्टल व ॲप, दैनंदिन कामासाठी विविध प्रणाली इ. माध्यमातून डिजिटल सेवा- सुविधा दिल्या आहेत.
शेती सिंचनासाठी दिवसा वीजपुरवठा व्हावा, या हेतूने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना टप्पा 2 या महत्वकांक्षी प्रकल्पाची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. शेतीपंपाचा वीजभार अधिक असलेल्या विद्युत उपकेंद्राच्या परिसरात पडिक व नापीक जमिनीवर 0.5 ते 25 मेगावॅट क्षमतेचे विकेंद्रीत सौरप्रकल्प उभारण्याचे पहिल्या टप्प्यातील काम सुरू झाले आहे.
स्वंयस्फुर्तीने व विविध योजनांच्या माध्यमातून रुफ टॉप सोलर बसविण्यास ग्राहक प्राधान्य देत आहेत. त्याव्दारे ग्राहक विजेच्या बाबतीत स्वंयपूर्ण होत आहेत. ही बाब पर्यावरणीयदृष्ट्या अधिक हीतकारक आहे. पायाभूत वीजसुविधांच्या बळकटीकरणासाठी आरडीएसएस योजनेची अंमलबजावणी परिवर्तनकारी ठरणार आहे.
नवीन वीजजोडणी त्वरीत देणे, वीजग्राहकांना अचूक वीजबिले देणे, सुरळीत वीजपुरवठा ठेवणे, ग्राहकांच्या तक्रारीचा जलद निपटारा या दैनंदिन कामात सामूहिक प्रयत्नातून मागील काळात आमुलाग्र सुधारणा केली आहे. परिणामी वीजबिल वसूलीचे प्रमाण ही सुधारले आहे. कंपनीचा वर्धापन दिन साजरा करताना कंपनीसमोरील आगामी ध्येये व आव्हाने याबद्दल आत्मचिंतन व गतकाळाचे सिंहावलोकन व्हावे, याच सदिच्छा आहेत. प्रत्येक घर प्रकाशमान व्हावे, शेती व उद्योगाची भरभराट व्हावी, यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांना, ज्यांच्यासाठी हा खटाटोप सुरू आहे त्या सर्व ग्राहकांना वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आहेत.
विशेष साैजन्य- किशोर खोबरे जनसंपर्क अधिकारी
पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.