विनायक जितकर
कोल्हापूर जिल्ह्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमातून केली घोषणा…
कोल्हापूर – उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कोल्हापूर जिल्ह्यात एमआयडीसी विस्तारीकरणाची घोषणा शासन आपल्या दारी कार्यक्रमातून केली आहे. कोल्हापूरमधील लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार एमआयडीसीची विस्तारीकरण करण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले. उदय सामंत म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्याच्या एमआयडीसीचा इतिहास बघता एमआयडीसी जागा संपली आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार उद्योग विभागाने कोल्हापूरचा एमआयडीसी विस्तारीकरणाचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूरमधील तरुण-तरुणींना रोजगार दिला गेला पाहिजे.
सांगली जिल्ह्यातील आष्टा, शाहुवाडी, पन्हाळा आणि प्रकाश आबिटकरांच्या मतदारसंघात एमआयडीसीचा विस्तार केला जाईल. येत्या सहा महिन्यात हे विस्तारीकरण केलं जाईल. नवीन एमआयडीसीमध्ये 15 टक्के जागा लघू उद्योगासाठी राखीव ठेवली जाईल, अशी घोषणा सामंत यांनी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील तरुण आणि तरुणी स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात, व्यवसाय करू शकते हे दाखवून देण्याची शिंदे फडणवीस सरकारची योजना आहे.
दरम्यान, कोल्हापूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी कोल्हापुरातील लाभार्थ्यांचा आढावा घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातून 75 हजार लाभार्थ्याचे टार्गेट होते. मात्र ते 1 लाख 58 हजार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत कधी झालेला नसेल असा हा कार्यक्रम माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या प्रेरणेने माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाने आणि जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आपण हा पूर्ण करू शकल्याने, आपल्या सर्वांचा मनापासून आभारी असल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले. यावेळी विविध लाभार्थ्याचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर 28 लाभार्थ्यांना स्थान देण्यात आले होते.