अखेर मृत्यूशी त्यांची झुंज अपयशी ठरली… करवीर सह कोल्हापूर जिल्ह्यात शोककळा…
कोल्हापूर- कोल्हापुरातील काँग्रेस पक्षाचे आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी. एन. पाटील यांचे गुरुवारी २३ मे रोजी पहाटे निधन झाले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर मृत्यूशी त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आमदार पी. एन. पाटील हे ७१ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे. एक पक्षनिष्ठ सच्चा काँग्रेसचा नेता हरपल्याची भावना सर्वांच्यात निर्माण झाली आहे.
रविवारी १९ मे च्या सकाळी त्यांच्या राहत्या घर चक्कर येऊन पडले होते. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. यानंतर त्यांना तातडीने जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. दरम्यान काही दिवसांपासून ते कमी रक्तदाबाच्या समस्येचाही सामना करत होते. शेवटी डॉक्टरांनी केलेले शर्थीचे प्रयत्न देखील अपुरे पडले. आज गुरुवारी पहाटे त्यांची प्राणजोत मालवली.
काँग्रेस पक्षाचे आक्रमक आणि निष्ठावान नेतृत्व आज आम्ही गमावले आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पी. एन.पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर निष्ठावंत नेत्याच्या निधनामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे.