डॉ. सदानंद मोरे यांना ‘मारुतीराव जाधव जीवनगौरव’ पुरस्कार… तळाशी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा; डॉ. मोरे यांच्या वतीने डॉ. नंदकुमार मोरे यांनी स्वीकारला पुरस्कार…
तुरंबे प्रतिनिधी (विनायक जितकर) – संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, विचारवंत आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रा. डॉ. सदानंद मोरे यांना यंदाचा ‘मारुतीराव जाधव (तळाशीकर गुरुजी) जीवनगौरव पुरस्कार’ मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. संत साहित्य, सामाजिक विचार, अध्यात्म आणि वैचारिक क्षेत्रात डॉ. मोरे यांनी दिलेल्या प्रदीर्घ व उल्लेखनीय योगदानाचा गौरव म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. डॉ. मोरे यांच्या वतीने शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी पुरस्कार स्वीकारला.
या सोहळ्यास पालकमंत्री प्रकाश आबिटकर, डॉ. नंदकुमार मोरे, कॉम्रेड संपत देसाई, पत्रकार सचिन परब, व्यंकप्पा भोसले, वसंत पाटील, वीरेंद्र मंडलिक, उदयसिंह पाटील कौलवकर, प्रा. जालिंदर पाटील, नाथाजी पाटील, तहसीलदार अनिता देशमुख यांच्यासह जाधव कुटुंबीय व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव व ह. भ. प. मारुतीराव जाधव (तळाशीकर गुरुजी) चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमास तळाशी पंचक्रोशीतील नागरिक, वारकरी, भजनी मंडळे आणि संत साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रस्थाविक अरुण जाधव यांनी केले. यावेळी प्रा. जालिंदर पाटील, डॉ. नंदकुमार मोरे, कॉम्रेड संपत देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केली.
आमची NGO.. आपला CSR FUND.. तर चला करूया सामाजिक कार्य...
जाधव गुरुजींचे कार्य प्रेरणादायी : प्रकाश आबिटकर
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “मारुतीराव जाधव गुरुजी यांनी शिक्षण, समाजप्रबोधन आणि संस्कारांच्या माध्यमातून समाजाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या कार्याची आणि विचारांची प्रेरणा पुढील पिढीला मिळावी, या उद्देशाने दिला जाणारा हा जीवनगौरव पुरस्कार निश्चितच प्रेरणादायी आहे.” ते पुढे म्हणाले, “डॉ. सदानंद मोरे यांनी संत साहित्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची संतपरंपरा आणि वैचारिक वारसा समृद्ध केला आहे. संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा अभ्यास, लेखन आणि प्रसार करताना त्यांनी संतविचार समाजापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांना हा पुरस्कार मिळणे हा जाधव गुरुजींच्या विचारांचा आणि डॉ. मोरे यांच्या कार्याचा सुंदर संगम आहे.” “संतविचार, समाजप्रबोधन आणि संस्कारांची ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हीच मारुतीराव जाधव गुरुजींना खरी आदरांजली ठरेल,” असेही आबिटकर यांनी सांगितले.
‘कान्होबा महाराज गाथेचे’ प्रकाशन
कार्यक्रमात संत तुकाराम महाराजांचे बंधू कान्होबा महाराज यांच्या अभंगांचे निरूपण करण्यात आलेल्या ‘या गाथेचे’ प्रकाशन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. संत तुकाराम महाराजांच्या संतपरंपरेतील कान्होबा महाराजांचे साहित्य, विचार आणि योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने या प्रकाशनाला विशेष महत्त्व असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
संत साहित्याच्या अभ्यासातून वैचारिक समृद्धी
मारुतीराव जाधव गुरुजी यांनी संत साहित्याचा सखोल अभ्यास करून महाराष्ट्राच्या समृद्ध वैचारिक आणि सांस्कृतिक परंपरेचे विविध पैलू समाजासमोर मांडले आहेत. संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा अभ्यास, लेखन आणि प्रसार यासाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय आहे. संत साहित्य आणि सामाजिक विचार यांची सांगड घालत त्यांनी केलेले लेखन व चिंतन अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरले आहे.
पुरस्काराचे दुसरे वर्ष
‘मारुतीराव जाधव (तळाशीकर गुरुजी) जीवनगौरव पुरस्कार’चे हे दुसरे वर्ष आहे. समाजप्रबोधन, अध्यात्म आणि कीर्तन परंपरेत उल्लेखनीय योगदान देणारे प्रसिद्ध कीर्तनकार शामसुंदर महाराज सोन्नर यांना पहिला पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यंदा संत साहित्याच्या क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. सदानंद मोरे यांची निवड करण्यात आली.
तळाशीत संतविचारांचा जागर
पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने तळाशी परिसरात संत साहित्य, अध्यात्म आणि वारकरी परंपरेचा जागर झाला. विविध भजनी मंडळे व वारकरी संप्रदायाच्या सहभागामुळे कार्यक्रमाला भक्तिमय वातावरण लाभले. मारुतीराव जाधव गुरुजी यांच्या स्मृतींना अभिवादन करत संतविचार, संस्कार आणि समाजप्रबोधनाची परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला. डॉ. सदानंद मोरे यांचा झालेला हा गौरव म्हणजे संत साहित्याच्या प्रदीर्घ परंपरेचा आणि महाराष्ट्राच्या वैचारिक वारशाचा सन्मान ठरला. त्यांच्या अनुपस्थितीत डॉ. नंदकुमार मोरे यांनी पुरस्कार स्वीकारल्याने सोहळ्याला भावनिक आणि वैचारिक अधिष्ठान लाभले.
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.










































































