कोल्हापूर: वार्षिक उद्योग पाहणी अंतर्गत उद्योगांनी माहिती देण्यासाठी सहकार्य करुन देशाच्या व राज्याच्या उद्योग वाढीच्या मोजमापात योगदान द्यावे, असे प्रतिपादन अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर यांनी केले.नियोजन विभागाच्या अधिनस्त अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई तर्फे राज्यातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांची सन 2021-22 या वर्षाच्या क्षेत्रकामासाठी 19 ते 21 एप्रिल अशी तीन दिवसीय कार्यशाळा यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम व प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, कोलकाताच्या औद्योगिक सांख्यिकी विभागाच्या उपमहानिदेशक सौम्या चक्रवर्ती, राष्ट्रीय नमुना पाहणी विभागाच्या पुणे येथील क्षेत्रीय कार्यालयाचे संचालक आलोककुमार, उद्योग विभागाचे प्रतिनिधी पी.डी.रेंदाळकर, पुणे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक आणि अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक विजय आहेर तसेच राज्यातील पुणे विभागातील अर्थ व सांख्यिकी प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक ह.ल.माळी, कोल्हापूर जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक सायली देवस्थळी आणि क्षेत्रकाम करणारे कर्मचारी या कार्यशाळेस उपस्थित होते.
उपमहानिदेशक सौम्या चक्रवर्ती यांनी जगात बहुतांश देशांमध्ये वार्षिक उद्योग पाहणी घेण्यात येत असल्याचे सांगून आपल्या देशातील वार्षिक उद्योग पाहणीमध्ये सर्वात अधिक उद्योगांची पाहणी केली जात असल्याची अभिमानास्पद बाब नमूद केली व माहिती विहीत वेळेत संकलित करुन उपलब्ध करुन देण्याचे महत्व अधोरेखित केले.
प्रास्ताविकात अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या उपसंचालक दिपाली धावरे यांनी वार्षिक उद्योग पाहणीबाबत सर्व उपस्थितांना अवगत केले. अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे सहसंचालक नवेन्दु फिरके यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय कोलकाताचे उपसंचालक रणबीर डे व बाप्पा करमरकर, प्रख्यात अर्थतज्ञ व प्राध्यापक प्रदिप आपटे, गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे राष्ट्रीय नमुना पाहणी कार्यालयाच्या पुणे क्षेत्रीय कार्यालयाचे उपसंचालक श्रीनिवास शिर्के आणि महेश चोरघडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे अपर संचालक डॉ.जितेंद्र चौधरी हे सत्र नियंत्रक व तज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या संबंधित अनुभवी प्रशिक्षकांद्वारे वार्षिक उद्योग पाहणीच्या कामाचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण संगणकावर घेण्यात आले व प्रशिक्षणार्थींच्या अडचणींचे निराकरण करण्यात आले. कार्यशाळेच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी यशदाचे उपमहानिदेशक डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी हे अध्यक्षस्थानी व अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे अपर संचालक पुष्कर भगूरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.