महाराष्ट्रातील एकमेव गोकुळ हर्बल पशुपूरक प्रकल्प
जनावरांच्या उपचारासाठी गोकुळची आयुर्वेदिक उत्पादन
महाराष्ट्रातील एकमेव व देशातील तिसरा गोकुळ हर्बल पशुपूरक प्रकल्प कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, आणंद (एन.डी.डी.बी) यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना, गडमुडशिंगी येथे कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पाची उत्पादन क्षमता प्रतिदिन ४०० किलो इतकी असून पहिल्या टप्प्यामध्ये या प्रकल्पामधून सहा प्रकारच्या हर्बल पशुपूरक (हर्बल औषधे) उत्पादनांची निर्मिती होणार आहे. उत्पादित होणाऱ्या हर्बल पशुपूरकांचा वापर संघाच्या सर्व पशुवैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत दूध उत्पादकांच्या जनावरांच्या विविध आजारांचा प्रतिबंध व उपचारांसाठी करण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पाचा खर्च रु. १ कोटी २६ लाख इतका असून यापैकी एन.डी.डी.बी.चे अनुदान (३०%) रु.३७.८४ लाख व संघाचा हिस्सा (७०%) रु.८८.३० लाख इतका आहे.
हर्बल पशुपुरके उत्पादन आणि पुरवठा साखळी सुविधा या योजनेंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. यामध्ये नैसर्गिकपणे सहज उपलब्ध असणाऱ्या औषधी वनस्पती व स्वयंपाक घरातील दररोजच्या वापरातील विविध (कोरफड,हळद,चुना,हाडजोड,कढिपत्ता, लिंबू,कडूनिंब,तुळस,लसूण,जिरे,लोणी,तूप,मोहरी,तिल तेल,गुळ,शेवगा,पाने,मुळा,लाजाळू पाने, तमालपत्र,विड्याची पाने,काळी मिरी,मोठे मीठ,निंबोळी,घाणेरी पाने,खसखस,हिंग आदी) मसाल्यांचे पदार्थांचा वापर करून अॅलोव्हेरा ज्यूस, हळद चूर्ण, ज्वरशामक, पंचामृत, पाचक, ट्रायसो (ट्रायसोडिअम सायट्रेट) या सहा हर्बल पशुपूरक उत्पादनांची निर्मिती सुरु केली जाणार आहे.
गोकुळच्या या हर्बल उत्पादनांमुळे जनावरांच्या स्तनदाह, कासेला सूज येणे, सडाला चिराभेगा, चामखिळ, अपचन, गाभण न राहणे, माजावर न येणे, ताप येणे, लाळ खुरकत, लम्पी, सांधे सूज, खोकला, विषबाधा, गोचीड, जनावरास उठता न येणे अशा विविध आजारावर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचार करणे सहज सुलभ होणार असून या प्रकल्पाद्वारे उत्पादित होणाऱ्या हर्बल पशुपूरक उत्पादनांचा वापर करून दूध उत्पादकांनी या उपचार पद्धतीचा अवलंब करावा.
प्रकल्पाचा उद्देश:
१. पारंपारिक घरगुती औषधोपचार पद्धतीला चालना देणे.
२. दूध उत्पादकांना खात्रीशीर गुणवत्तेची हर्बल औषधे किफायतशीर दरात उपलब्ध करणे.
३. जनावरातील विविध आजारांवर उपचाराकरिता होणाऱ्या अॅलोपॅथिक औषधाच्या अति वापरामुळे जनावरांच्या शरीरावर होणारे दुष्परिणाम कमी करणे.
४. स्वच्छ आणि प्रतिजैवक (अँटिबायोटिक) अंश विरहित दूध उत्पादन करण्यास प्रोत्साहन देणे.
५. अॅलोपॅथिक औषधाचा खर्च कमी होणार आहे.
६. ही औषधे उत्पादकांना सहज व सुलभ पद्धतीने वापर करता येणार आहेत.
७. ही औषधे नैसर्गिक असल्यामुळे जनावरांच्या शरीरावर दुष्परिणाम होणार नाहीत.
८. या औषधांमुळे जनावरांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास चालना मिळणार आहे.
*** चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळ ने सर्वसामान्य दूध उत्पादक केंद्र बिंदू मानून त्यांच्या उत्कर्षासाठी व किफायतशीर दूध व्यवसायासाठी सातत्याने विविध प्रशिक्षण कार्यक्रम, योजना व सेवासुविधा प्रभावीपणे राबविण्यात येतात. तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांच्यासाठी २४ x ७ पशुवैद्यकीय सेवा पुरविली जाते. संघाने स्तनदाह (मस्टायटीस) प्रतिबंध कार्यक्रम अंतर्गत सन एप्रिल २०१७ ते मार्च २०२४ अखेर सर्व पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत एकूण ५५ हजार इतक्या जनावरांना फक्त आयुर्वेदिक उपचार केले असून त्यापैकी ४१ हजार जनावरे म्हणजे ७५ % बरी झाली आहेत.***
गोकुळने सुरु केलेल्या हर्बल पशुपूरक उत्पादनांच्या वापरामुळे दूध उत्पादकांचा जनावरांच्या औषध उपचारावरील खर्च कमी होणार असून सदरच्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये (इ.व्ही.पी- एथनो व्हेटरनरी प्रिपरेशन) शेतकऱ्यांच्या घरात उपलब्ध असलेल्या व पर्यावरणपूरक सामुग्रीचा वापर करून जनावरांच्या आजारावर उपचार केले जाणार आहेत. त्यामुळे प्रतिजैवक (अँटिबायोटिक) औषधांचा होणारा अति वापर कमी होऊन प्रतिजैवक (अँटिबायोटिक) अंश विरहित दूध निर्मिती होऊन चांगल्या प्रतीच्या दुधाचे उत्पादन करून ग्राहकांना देणे शक्य होणार आहे असा विश्वास व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्यातील सहकारातील सर्वप्रथम उभारणी करण्यात आलेल्या एकमेव गोकुळच्या हर्बल पशुपूरक प्रकल्पाचे उद्घाटन सोहळ्याचे आयोजन सोमवार दिनांक – २२/०७/२०२४. इ.रोजी संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमुडशिंगी, ता.करवीर येथे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री नामदार हसन मुश्रीफसो यांचे शुभहस्ते माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटीलसो यांच्या अध्यक्षतेखाली व आघाडीचे सर्व नेते, गोकुळचे सर्व संचालक, प्राथमिक दूध संस्थांचे प्रतिनिधी, गोकुळचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे अशी माहिती संघाचे चेअरमन अरुण ग.डोंगळे तसेच संघाचे डॉ.विजय मगरे यांनी दिली.