सरपंच महासंघ तर्फे प्रांताधिकारी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन…
शिरपूर (गोपाल के.मारवाडी) – आपल्या गावातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांच्यावर गावाची सर्वस्वी जबाबदारी असते. गावात शांतता नांदावी, तरुण पिढी जुगार व इतर व्यसनांच्या आहारी जाऊ नये यासाठी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच गावात दक्षता घेत असतो. पण जेव्हा गावातील गावगुंड हे सरपंच, उपसरपंचाला न जुमानता दादागिरी करतात तेव्हा गावातील शांततेचा भंग होतो. मग ग्रामपंचायत सदस्यांनी कसे काम करावे असा प्रश्न निर्माण होतो.
शिरपुर तालुक्यातील ग्राम सावळदे येथील कर्तव्यदक्ष युवा उपसरपंच सचिन पद्मसिंह जाधव यांना 14 फेब्रुवारीला सावळदे गावात जुगार अड्डा चालू असल्याचे कळले, तेव्हा जुगार खेळणाऱ्यांना गावात जुगार खेळू नका असे सांगितल्यावर त्यांना त्याचा राग आला व त्या गावगुंडांनी उपसरपंच सचिन जाधव यांच्या घरी जाऊन हैदोस घातला व त्यांच्या भावाला मारहाण केली. ही घटना धक्कादायक असून या प्रकारामुळे ग्रामीण भागातील अवैध व्यवसायांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आपण केलेल्या कृत्यामुळे आपल्यावर कार्रवाई होऊ शकते म्हणून हे गावगुंड उलट फिर्याद दाखल करण्यासाठी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणे, तक्रारदारांविरूद्ध उलट खोटी फिर्याद देणे, यासाठी प्रयत्नशील आहेत. म्हणजे “चोरांच्या उलट्या बोंबा” असाच हा प्रकार आहे.
शिरपूर तालुका सरपंच महासंघ तर्फे प्रांत व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली कि सरपंचांच्या सुरक्षेसबंधी कठोर पावले उचलावीत. शिरपूर शहर व तालुका हा विकसनशील व शांतताप्रिय तालुका म्हणून परिचित आहे.असे जुगार अड्डे, अवैध धंदे बंद करून तालुक्यात शांतता नांदावी. सावळदे गावातील व तालुक्यातील गावगुंडांचा बंदोबस्त करावा, अन्यथा येत्या काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा विनंतीवजा इशारा सरपंच सेवा महासंघ तर्फे देण्यात आला आहे.
निवेदनावर सरपंच महासंघाचे तालुकाध्यक्ष तथा बोरगाव सरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, महासंघाचे संघटक सोमा भिल, तालुका संपर्क प्रमुख चंद्रकांत (भुरा) पाटील, वाठोडा सरपंच नारायण कोंडू चौधरी, अहिल्यापूर सरपंच संग्रामसिंग राजपूत, बुडकी सरपंच विश्वास पावरा, कुरखळी सरपंच किरण धनगर, जैतपूर सरपंच भोजेसिंग राजपूत, वाघाडी सरपंच किशोर माळी, नांथे सरपंच नेपाल राजपूत, खरदे उपसरपंच देविदास पाटील, पिंप्री सरपंच महेंद्र सिसोदिया, जातोडा माजी सरपंच देवेंद्र राजपूत, बाळदे ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील व तालुक्यातील बहुतांश सरपंच उपसरपंचांच्या स्वाक्ष-या आहेत.