TEAM POSITIVE WATCH – साैजन्य – newsintercontinentalmu.in
गडगडत्या नभातल्या वीजांच्या कडकडाटासह वादळी वा-यात बरसणा-या परतीच्या पावसासोबतच राज्यकारभाराची मुदत संपुष्टात आलेल्या ‘महायुती’च्या सम्राटांनी महाराष्ट्रावर कल्याणकारी योजनांचा वर्षाव करून चिंब करून टाकलय.
या योजना आधीच जाहीर होउन त्याची अंमलबजावणी झाली असती तर लोकांना सरकारचा आणि कल्याणकारी हेतू जास्त पटला असता. परंतु, ऐनवेळी राज्यात आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच त्यातील बहुतांश योजनांची घोषणा झाल्याने सर्वसामान्य नागरिक साशंक झाले.
तस ही पाहिलं तर जनतेला आपण सरकारी योजनांचे मोफत लाभार्थी आहोत असे सांगितलेले, जाणवून दिल्यासारखे आवडत नाही. खैरातीच्या स्वरूपात तर नाहीच नाही. तरीसुद्धा लाडकी बहीण कुठल्याही मतमतातरांना व नकारात्मक मानसिकता रूजवू पाहणा-या इतर राजकीय पक्षांना न जुमानता प्रभाव टाकणार अशी आत्तातरी लक्षण दिसतायत.
ताज्या बातम्या नुसार ऐन वेळेस राज्यात आचार संहिता जाहीर झाल्याने या विविध योजनांचे तब्बल १४९ GR निवडणूक आयोगाने रद्द केले आहेत.
राज्यातील सर्व राजकीय वातावरण आता चांगलेच तापले आहे. विरोधी महाविकास आघाडी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील यशाने तर मुख्य सत्ताधारी पक्ष भाजप हरियाणा निवडणुकीत मिळालेल्या अनपेक्षित यशाने खूश आहे.
पण या दरम्यान महाराष्ट्रात बरेच पाणी राजकीय पुलाखालून वाहून गेले आहे. महाराष्ट्रावर वर्चस्व असलेले ठाकरेंचे शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी (जे स्वतःच आता एक राजकीय पक्ष बनलेआहेत) सारख्या जुन्या पक्षांच्या भाजपच्या दिल्ली हायकमांडने धूर्त राजकारणाने चिरफाळ्या उडवल्या. एकेका पक्षाच्या दोन आवृत्या तयार झाल्या. महाराष्ट्राने प्रचंड राजकीय, आर्थिक, सत्तालालसेचे ताकदीचे राजकारण पाहिले. राज्यकारभार बाजूला राहून दोन उपमुख्य मंत्री व सदैव धास्तावलेले जुने, नवे शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य महाराष्ट्राने पाहिले.
2014 पासून सत्तेत असुनही व फडणवीसांच्या काळात ठीक काम करत असलेल्या सरकारची प्रतिमा भाजप हायकमांडनेच मोडीत काढून 2019 मधे सत्तेपासून सर्वात मोठा पक्ष असुनही लांब बसवून इतर पक्षांच्या लंगोटीस हात घातला. पक्षापक्षात जुन्या जेष्ठ सदस्यांच्या सत्तेच्या महत्वकांक्षेला मोहोर आणून पक्ष प्रमुखांना भांबावून टाकले. पण सत्तेवर आणलेल्या या त्रिमूर्तीला जागोजागीची बंडाळी व नाराजी दूर करताना फेस आला. राज्यकारभारात सर्वसामान्यांना कुठे काम दिसेना. लोकसभेत याचा फायदा घेत पवारसाहेबांनी वय विसरून राहिलेल्या काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीतल्या प्यादांना एकत्र करून स्थानिक बारामती व इतरत्रची युद्धे जीव लावून जिंकली. काँग्रेस ला धक्के देउन, शिवसेनेला चुचकारून जागेवर आणत त्यांच्यात ही स्पिरीट आणले. महाराष्ट्रातील राजकारण व समाजकारणात अचानक अवतीर्ण झालेले जरांगे पाटील, त्यांचा प्रभाव शांतता व संयमाने हाताळल्याचा बोनस लोकसभेतल्या जोरदार मुसंडीत प्रत्ययाला आला. फडणवीसांच्या ताकत खच्चीकरणाचा डाव टाकून लोकसभा निवडणुकीत मोठे पुनरागमन केले!
आता राजकीयदृष्ट्या स्वच्छ महाराष्ट्राच्या आकाशात राजकीय ताऱ्यांची अशी मांदियाळी तयार झाली आहे ती कधीच दिसली नाही. भाजपने सर्वांनाच प्रथम एकत्र आणून, पक्षात घेवून व नंतर उरलेले पक्ष मोडून स्वतःच्याच इमेज ला नख लावल. मूळ भाजपचे सदस्य ओळखा म्हणायची वेळ आणली. सर्वसामान्यांच्या मनात निर्माण. होऊ लागलेले घरटं स्वतःच मोडलं, त्यातच गुजरातेत होऊ लागलेल्या स्थलांतराची भर पडली, त्याची किंमत मोजावी लागली. पक्ष,त्यांचे प्रमुख, पहिल्या फळीतील नेते, द्वितीय श्रेणीतील नेते, कार्यकर्ते, यांच्यात ‘कोण कोणाचे ‘ याचा गोंधळ उडवून दिला. एकप्रकारे, याने सर्वसामान्य आणि प्रथम श्रेणीतील राजकीय कार्यकर्त्यांत मोठा संभ्रम निर्माण झाला. , कोणाला पाठिंबा द्यायचा आणि मतदान करायचे. सामान्य जनतेचे स्थानिक प्रतिनीधी नेते तात्कालिक लाभार्थी बनले, स्थानिक नेत्यांनी पक्ष बदलला किंवा तो पक्षच फुटला की आजवर कोणाच्या नेतृत्वाखाली काम केले किंवा कोणत्या पक्षाच्या बड्या नेत्याकडे पाहून विश्वास टाकला या निष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण होउनगोंधळ माजला. आता नेते आणि कार्यकर्ते अनिश्चित झाले आहेत. बंडाळ्या, पक्षांतरे धमक्या यांना ऊत आला आहे.त्यांना एकसंध ठेवण्यासाठी वरच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ँ
एक प्रकारे ही लढाई उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि शरद पवार, नाना पटोले आणि महायुती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, फडणवीस आणि एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर आणि दलित मते आणि जरंगे पाटील, देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांच्यातील लढाई बनली आहे.
जरंगे पाटील फॅक्टर मराठवाडा, अहमदनगर आणि विदर्भातील काही मतदारसंघात निर्णायक ठरेल आणि प्रकाश आंबेडकर फॅक्टरही. मराठा आणि दलित यांच्यात नव्याने उफाळलेल्या जातीय मतांतरामुळे बरीच मते जातीय मार्गाने जाणार आहेत. याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो. लोकांच्या मते, शरद पवार-राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे-शिवसेना, सायलेंट काँग्रेस’ आणि कदाचित त्यांच्या स्वतःच्याच सहकारी मित्रपक्षाकडून देवेंद्र फडणवीसांचे वाढते राजकीय वर्चस्व आंतरवेली सराटीतून कमी करण्याचा डाव आत्तातरी यशस्वी झाला आहे.
मात्र अलीकडच्या काळात जरंगे पाटील यांचा व्यापक प्रभाव मर्यादित करण्यात सर्वच चतुर राजकारण्यांनी खेळलेला राजकीय खेळ यशस्वी होत आहे. निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचे आवाहन आणि डावपेच हे त्यांच्या कडील कमी होत असलेल्या कार्डांपैकी एक आहे.
आणखी फुटीच्या भीतीने कोणतीही आघाडी मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर करण्यास तयार नाही. किंबहुना ठराविक नाव जाहीर झाल्यास मतदानावरही परिणाम होईल!
सर्वच महा विकास व महायुतीत एकमेकांबद्दल संशय आहे आणि याचा परिणाम निवडणूक प्रचारावर होईल. तुर्त तरी महाराष्ट्रात गोंधळाचे वातावरण आहे.
![]() |
![]() |
![]() |