विनायक जितकर
पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली…
कोल्हापूर – कोल्हापुरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूरकरांना महापुराची धास्ती वाटत असतानाच पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. भारतीय हवामान खात्याने सोमवारी कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्टचा इशारा दिल्यानंतर पडलेल्या मुसळधार पावसाने कोल्हापूरवर पुन्हा एकदा महापूराचे सावट ओढावले आहे.
काल पंचगंगा नदी इशारा पातळी जवळून वाहत असल्याने कोणत्याही क्षणी इशारा पातळी ओलांडून जाईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या आकडेवारीनुसार पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पातळी 38.7 इंच इतकी होती ती आता 39 फूट 06 इंच इतकी झाली आहे. तर पंचगंगा नदीची इशारा पातळी ही 39 फूट वर पोहोचली आहे. पंचगंगेची धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यात एकूण 83 बंधारे पाण्याखालील गेलेली आहेत.
पंचगंगेच्या वाढत्या पातळीवर खबरदारी म्हणून प्रशासनाने नागरीकांना स्थलांतरित होण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार प्रयाग चिखली गावातील लोकांचे स्थलांतर होत आहे. त्यानंतर शहरातील सुतार वाडा येथे रात्री व सकाळी नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या अग्निशामन विभागाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत. |
राधानगरी धरणाच्या पाणलोट आणि धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून राधानगरी धरण पूर्ण भरण्याल्यावर पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. सध्या राधानगरी धरण 86 टक्के भरले असून धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.