सौरछतासाठी 40 टक्के अनुदान– कोल्हापूर, सांगलीत 306 ग्राहक लाभार्थी ; महावितरणचे घरगुती ग्राहकांना लाभ घेण्याचे आवाहन
कोल्हापूर : सौरऊर्जा ही शाश्वत व स्वच्छ ऊर्जेचा एक प्रमुख स्त्रोत आहे. भविष्यातील गरज, पर्यावरणाचे हीत व आर्थिक बचत या हेतूने ग्राहकांची पाऊले हळूहळू सौरऊर्जेकडे वळत आहेत. घरोघरी छतावर सौरऊर्जानिर्मिती संच बसविल्यास ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपुर्ण होणे सहज शक्य आहे. घरगुती ग्राहकांना सौरछतासाठी केंद्र शासनाचे 40 टक्केंपर्यंत अनुदान आहे. या योजनेतून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 306 घरगुती ग्राहकांनी आपल्या छतावर 1 हजार 80 किलोवॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसविली आहे. 524 ग्राहकांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू आहे. तरी या योजनेचा इच्छूक घरगुती ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता मा.श्री.परेश भागवत यांनी केले आहे.
केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा विभागाच्या योजनेतून घरगुती ग्राहकांना 1 ते 3 किलोवॅटपर्यंत सौर छत संचास 40 टक्के तर पुढील 3 पेक्षा अधिक ते 10 किलोवॅटपर्यंत 20 टक्के अनुदान आहे. सामुहिक वापरासाठी 500 किलोवॅटपर्यंत मात्र प्रत्येक घरासाठी 10 किलोवॅट मर्यादेत समूह गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना 20 टक्के अनुदान मिळणार आहे. सौरछत संच अनुदानासाठी प्रतीकिलोवॅटप्रमाणे संचाचे मुलभूत दर पुढीलप्रमाणे निश्चित केले आहेत. 1 ते 3 किलोवॅटकरीता रू.41400/-, 3 पेक्षा अधिक ते 10 किलोवॅटकरीता रू.39600/-, 10 ते 100 किलोवॅट करीता रू.37000/- तर 100 ते 500 किलोवॅटकरीता रू.35886/- असे दर आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 207 घरगुती वीज ग्राहकांनी 766 किलोवॅट तर सांगली जिल्ह्यातील 99 ग्राहकांनी 314 किलोवॅट क्षमतेची सौरछत यंत्रणा बसविली आहे. या योजनेची संपूर्ण माहिती व ‘ऑनलाईन’ अर्जाची सोय, मार्गदर्शक तत्वे, एजन्सी निवडसुची, शंका-समाधान इ. माहिती महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरील https://www.mahadiscom.in/ismart/ या लिंकवर उपलब्ध आहे.
सौरछताव्दारे दरमहा 1 कोटी युनिट वीजनिर्मिती
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात विविध वर्गवारीतील 4 हजार वीजग्राहकांकडून सौरछताव्दारे दरमहा सरासरी 1 कोटी युनिट वीजनिर्मिती केली जाते आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 2 हजार 585 तर सांगली जिल्ह्यात 1 हजार 445 लघु व उच्चदाब वीज ग्राहकांनी छतावर एकूण 73 हजार किलोवॅट क्षमतेची सौर यंत्रणा बसविली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील घरगुती वर्गवारीत 1658, वाणिजिक्य 534, औद्योगिक 223, सार्वजनिक सेवा 165 व अन्य 5 अशा एकूण 2 हजार 585 वीजग्राहकांनी 47 हजार किलोवॅट क्षमतेची सौर छत यंत्रणा बसविली आहे. त्यात उच्चदाब वर्गवारीतील 81 वीजग्राहकांची 24 हजार 231 किलोवॅट क्षमता आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सौरग्राहकांनी डिसेंबर महिन्यात 77 लक्ष युनिटची सौरऊर्जानिर्मिती केली. सांगली जिल्ह्यातील घरगुती वर्गवारीत 813, वाणिजिक्य 293, औद्योगिक 125, सार्वजनिक सेवा 203 व अन्य 11 अशा एकूण 1 हजार 445 वीजग्राहकांनी 26 हजार किलोवॅट क्षमतेची सौर छत यंत्रणा बसविली आहे. त्यात उच्चदाब वर्गवारीतील 49 वीजग्राहकांची 13 हजार 725 किलोवॅट क्षमता आहे. सांगली जिल्ह्यातील सौरग्राहकांनी डिसेंबर महिन्यात 26 लक्ष 71 हजार युनिटची सौरऊर्जानिर्मिती केली.
सौर छत ग्राहकांचे वीजबिल शून्य
सौरछत यंत्रणा बसविलेल्या 1955 ग्राहकांचे डिसेंबर महिन्यातील वीज बिल शुन्य वीज युनिटचे आले आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील 1262 तर सांगलीच्या 693 ग्राहकांचा समावेश आहे.
स्पर्धा कुणाची… एक हजार ८३ खेळाडू, पहा महावितरणची अटीतटीची ही स्पर्धा कुणी जिंकली!
सर्वांनी एकजुटीने हा शासनमान्य उपक्रम राबविल्यास नक्कीच विजेची बचत हाेईल, फायदा हाेईल…- POSITIVVE WATCH