विनायक जितकर
सोलापूर येथे कर्तबगार महिला सन्मान स्वीकारताना डॉ. केतकी
कसबा बावडा – दक्षिण भारत दिगंबर कासार जैन संस्थेमार्फत सोलापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय महिला मेळाव्यात डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. केतकी धने यांचा कर्तबगार महिला म्हणून सन्मान करण्यात आला. डॉ. धने यांच्या शैक्षणिक व संशोधनात्मक कार्याची दखल घेऊन ज्येष्ठ समाजसेवक श्री विजय आण्णासो कासार यांच्याहस्ते त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
डॉ. केतकी धने या मागील बारा वर्षे शैक्षणिक व संशोधनात्मक कार्यामध्ये सक्रिय आहेत. 2023 मध्ये जयपुर नॅशनल युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पीएचडी पूर्ण केली. डायबिटीस, हृदयरोग, स्थूलपणा, सांधेदुखी अशा आजारावर नवनवीन आयुर्वेदिक औषधांचा वापर हा त्यांच्या संशोधनाचा गाभा आहे. आत्तापर्यंत जवळपास 15 राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये त्यांचे संशोधन प्रकाशित झाले आहे. असोसिएशन ऑफ फार्मासिटिकल प्रोफेशनलच्यावतीने आयोजित 22व्या इंडो युनायटेड स्टेट जागतिक परिसंवादामध्ये प्रथम क्रमांक तर फार्मासिटिकल कौन्सिल ऑफ इंडियाच्या वतीने नागपूरमध्ये झालेल्या परिसंवादामध्ये संशोधनासाठी तिसऱ्या क्रमांकाचे नामांकन मिळाले होते. नवभारत राष्ट्रीय ज्ञानपीठ पुणे यांच्यावतीने वूमन प्राईड या किताबाने सन्मानित करण्यात आले आहे.
शैक्षणिक व संशोधनात्मक कार्याची दखल घेऊन 29 एप्रिल 2023 रोजी सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात कर्तबगार महिला म्हणून श्री विजय आण्णासो कासार यांच्या हस्ते डॉ. धने यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी समस्त दक्षिण भारतीय दिगंबर जैन कासार संस्थान कार्यकारणी तसेच महिला कार्यकारणी व संपूर्ण महाराष्ट्रातील जैन समाज बांधव व भगिनी उपस्थित होते. डॉ. धने यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार पाटील, विश्वस्त आणि शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, प्राचार्य डॉ. चंद्रप्रभू जंगमे यांनी अभिनंदन केले.