भारतीय भाषांमधील साहित्य आणि पारंपारिक ज्ञान विकीपेडियावर आणण्यासाठी प्रयत्न करणार
कलाकारांचे मानधन वाढविण्यासाठी केंद्राला शिफारस करणार
पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीची बैठक उदयपूर येथे संपन्न
उदयपूर:पश्चिम क्षेत्रातील राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशातील लुप्त होणाऱ्या कला कौशल्यांच्या संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम आखण्याचा निर्णय शनिवारी येथे झालेल्या पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीच्या बैठकीत समितीचे अध्यक्ष ना.श्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहिर केला. यासाठी पश्चिम क्षेत्रातील सर्व राज्यांतून त्या त्या राज्यातील लुप्त होत चाललेल्या कला कौशल्यांचे दस्तावैजीकरण करण्यात येणार आहे. तसेच पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र देशात अव्वल क्रमांकावर राहावे यासाठीहीसुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीत अनेक उपयुक्त सूचना केल्या आहेत.
शनिवारी उदयपूर येथे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रम समितीची वार्षिक नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीला समितीचे नूतन अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, प.क्षे.सां.केंद्राच्या संचालिका श्रीमती किरण सोनी गुप्ता, श्री संतोष जोशी, अशोक परब, प्रा.युगांक नाईक प्रत्यक्षात उपस्थित होते. तर महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह इतर सदस्य राज्यातील शासकीय अधिकारी आणि इतर अशासकीय सदस्य दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना सुधीर मुनगंटीवार यांनी पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या कार्यक्रमांसाठी व योजनांसाठी सीएसआर मधून निधी मिळविण्यासाठी कसे प्रयत्न करावेत यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश दिले. सीएसआर निधीमुळे यापुढे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या विविध योजनांना निधीची कमतरता जाणवणार नाही, असे ते म्हणाले.या बैठकीत इतर अनेक महत्वाचे निर्णयही घेण्यात आले.
सांस्कृतिक वारसा आणि पारंपारिक ज्ञान विकीपेडियावर आणणार पश्चिम क्षेत्रातील सर्व राज्यांकडे मोठा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पारंपारिक ज्ञानाचा खजिना असून या सांस्कृतिक वारशाची तसेच पारंपारिक ज्ञान व साहित्याची माहिती विकीपेडीयावर नवीन पिढीला उपलब्ध व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना ना. श्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीत दिल्या. यासंदर्भात विकीपेडियाचे जागतिक संचालक होरे वर्गीस आणि त्यांच्या चमूने या बैठकीसमोर सादरीकरण केले.