अंबप येथे १९ वर्षीय युवकाचा खून : कारण अस्पष्ट
(शिरोली)- अंबप (ता.हातकणंगले) येथे यश किरण दाभाडे(वय १९) या युवकाचा धारदार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला.सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.खुनाचे कारण अजून समजू शकले नाही.
अंबप -वडगाव रस्त्यालगत भरवस्तीत पिण्याच्या पाण्याची टाकी आहे. येथून शंभर मीटर अंतरावर यश दाभाडे याचे घर आहे.बारावी पर्यंत त्याचे शिक्षण झाले होते.सायंकाळी साडेसहाच्या सुमारास यश कुत्रे फिरवायला म्हणून पाण्याच्या टाकीजवळ आला होता.मात्र काही वेळातच तो कुत्रे घरात बांधून पुन्हा टाकीजवळ आला होता. सांयकाळी सातच्या सुमारास यश दाभाडे याचा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे तिथे पाणी भरण्यासाठी गेलेल्या महिलेच्या निदर्शनास आले. तिने आरडाओरडा करताच त्या ठिकाणी गर्दी झाली.पाहिले असता यश मृत झाल्याचे आढळले.
याबाबत वडगाव पोलीस ठाण्यास कळविण्यात आल्यानंतर वडगाव पोलीसानी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली.आजूबाजूला तपास केला असता घटनास्थळाजवळच कोयता पडलेला आढळून आला. पोलिसांनी पाहिले असता मानेवर हातावर धारदार कोयत्याने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसून आले.यश याच्या अंगावर आठ वार होते .डाव्या हाताचा पंजा तुटला होता तर उजव्या हाताचा अंगठा चिरला होता.
घटनास्थळी वडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक विलास भोसले, सपोनि कैलास कोडक, उपनिरीक्षक संतोष माने यांनी धाव घेत पंचनामा व तपास सुरू केला.कोल्हापूरहुन फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक दाखल झाले आहे.पूर्व वैमनस्यातून यश याचा खून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून खुनाचे नेमके कारण व संशयित कोण याचा उलगडा अजून झाला नाही.यशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पारगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.त्याच्या याच्या मागे आई वडील, दोन विवाहित बहिणी आहेत.