चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ हरपली
मुंबई – “पडद्यावर आणि पडद्याच्या मागेही चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी ‘आई’ ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या निधनामुळे काळाने आपल्यातून ओढून नेली आहे. मराठीसह, हिंदी चित्रपट सृष्टीने एक लोभस, सहज अभिनयाने अनेकांच्या मनमनात घर केलेली एक महान अभिनेत्री आपण गमावली आहे, अशा शोकमग्न भावना करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रख्यात अभिनेत्री पद्मश्री, महाराष्ट्र भूषण सुलोचना दीदी यांना निधनाबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
शोकसंदेशात मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे की, सुलोचना दीदींनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी आपल्या व्यक्तिरेखांनी विशेषतः ‘आई’च्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले. दोन्ही चित्रपट सृष्टीतील अनेक कुटुंबांशी त्यांचे जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या जशा पडद्यावर प्रेमळ, सोशिक दिसतं, तश्याच त्या अनेकांसाठी मायेचा आधार होत्या. त्यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीतील अनेकांना पोरकेपणाची भावना निर्माण झाली असेल. काळाने त्यांना आपल्यातून ओढून नेल्याने आपण एक चित्रपटसृष्टीवर मायेची पाखर घालणारी “आई’ गमावली आहे, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांना आणि चित्रपट सृष्टीतील स्नेह्यांना हा आघात सहन करण्याची ताकद मिळावी, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.