चित्रात जे लपलेलं आहे,जे तुमच्या नजरेआडच आहे तेच दाखविण्याची किमया अन्वर कडे आहे…
पुणे : प्रदर्शनाचे पुण्यातल्या जवाहरलाल नेहरू आर्ट गॅलरी येथे अनौपचारिक उदघाटन प्रसिद्ध उद्योगपती मा. कल्याण तावरे , मा. हनुमंतराव गायकवाड आणि राज्याचे साखर आयुक्त मा. शेखर गायकवाड सर ह्यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. स्वतःला खोदतं जावं आणि आपल्याच आतात उतरतं जावं. आपणचं आपल्याला सापडावं असा माझ्या चित्रांचा प्रवास आहे. अन्वर हुसेन असं साधं साधं सांगून मोकळा झाला.
अन्वरची चित्रं
भवताल आणि भयताल असल्या अंधारलेल्या अवकाशात सापडलेली प्रकाशचित्रे म्हणजे अन्वर हुसेनचे टाईम ऑफ सिंफनी. दिसणं/पहाणं/निरखून पहाणं यात सूक्ष्म फरक आहे. अन्वर हुसेनच्या मनातले आकार जेव्हा आपल्यापर्यंत पोचतात तेव्हा आपणही अन्वरच्या मनाचा आरसा होतो. चित्रं कसं दिसतं? भावतं कसं? अनुभवतो कसं? ह्यामधे द्दश्य अद्दष्याचा खेळ सुरू होतो. त्याच्या चित्राला स्पष्ट चौकट नाही, जणू काही धुसरं रेंगाळणं…
स्वप्न /आठवणी/ मनाचे न उलगडलेले कप्पे/ कालौघात वहातं आलेली वळणं ह्यामधे आपसुक ओढले जातो. प्रत्येक चित्र जिवंत आहे.त्याच्या रंगाना सुगंध आहे. चित्रांना श्वास आहे. ती आपल्याशी संवादतात.एकटक न्याहाळलं की चित्रं हळवी होतात. सूर ऐकू येतात, चित्रांचे.. अन्वरचे काम पहाताना आपल्यालाच नवं नवं गवसत जातं. नवे अर्थ सापडतात. स्मरणरंजनात रमवतो अन्वर. मग त्याची चित्र त्याची न रहाता साहजिकच आपली होतात, असा हा आनंद देणारा खरा चित्रकार अन्वर हुसेन ! अन्वर आपल्या इस्लामपूरचा आहे याचा खरेच खूप अभिमान वाटतो…(आवर्जुन पहावे आणि आपणचं आपल्याला शोधावे असे हे प्रदर्शन..)