शासकीय रुग्णालयातील आपत्कालीन सेवांच्या गुणवत्तेबाबत विशेष समितीमार्फत सेवांचे होणार ऑडिट

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

आपत्कालीन सेवांमध्ये सुधारणा करण्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश

कोल्हापूर – राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय (सीपीआर) येथील आपत्कालीन सेवांच्या गुणवत्तेबाबत दर्जा उंचावण्यासाठी आणि कामकाजात शिस्त आणण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबंधित विभागाची आढावा बैठक घेतली. बैठकीत रुग्णालयातील काही विभागांमधील चुकीचा कारभार आणि रुग्णांकडून येणाऱ्या तक्रारींची अत्यंत गंभीर दखल घेण्यात आली असून, दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी यावेळी दिले.

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकारातून शेंडा पार्क परिसर आणि शहरात विविध आरोग्य सुविधा विस्तारत असून सीपीआर रुग्णालय आता अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज झाले आहे. मात्र, या सोयी-सुविधांचा लाभ रुग्णांना तितक्याच गतीने आणि तत्परतेने मिळणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी रुग्णांना आवश्यक सेवा विनाविलंब पुरवण्याचे कडक निर्देश दिले आहेत. सीपीआर हे जिल्ह्याचे प्रमुख रुग्णालय असल्याने येथे येणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकाला सन्मानाची वागणूक आणि योग्य उपचार मिळणे ही तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नैतिक आणि शासकीय जबाबदारी असल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले.

रुग्णालयातील आपत्कालीन सेवांच्या गुणवत्तेबाबत नुकतीच एक गंभीर घटना समोर आली होती, ज्यामध्ये एका रुग्णाला ‘गोल्डन अवर्स’मध्ये (अतिदक्षतेच्या काळात) तातडीची मदत न मिळाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या घटनेची दखल घेत त्यांनी एका विशेष चौकशी समितीची स्थापना केली आहे. ही समिती केवळ संबंधित घटनेचीच चौकशी करणार नसून, रुग्णालयातील सर्वच विभागांमधील कामकाजाचे सविस्तर ऑडिट करणार आहे.

विशेषतः अपघात किंवा तातडीच्या वैद्यकीय प्रकरणांमध्ये रुग्णांना त्वरित उपचार मिळणे अनिवार्य आहे. अशा परिस्थितीत जे अधिकारी किंवा कर्मचारी जाणूनबुजून कामात दिरंगाई करतील किंवा रुग्णांकडे दुर्लक्ष करतील, त्यांच्यावर कोणतीही हलगर्जी खपवून न घेता थेट कारवाई केली जाणार आहे. या बैठकीला खासदार शाहू छत्रपती, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सदानंद भिसे, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सरीता थोरात यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.