गारगोटीच्या आरोग्यसेवेला नवी ‘दृष्टी’! ३० खाटांचे अत्याधुनिक नेत्र रुग्णालय जनतेच्या सेवेत; १९ कोटींच्या कॅथलॅबचा आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते शुभारंभ!

भुदरगडच्या आरोग्य क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल, ग्रामीण रुग्णांना मिळणार अत्याधुनिक उपचारांची सुविधा!

गारगोटी प्रतिनिधी (विनायक जितकर) – भुदरगड तालुक्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी एक महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक पर्व सुरू झाले आहे. गारगोटी येथे ३० खाटांच्या अत्याधुनिक शासकीय नेत्र रुग्णालयाचे लोकार्पण, तसेच तब्बल १९ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या अद्ययावत कॅथलॅबच्या कामाचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील नागरिकांना आधुनिक आरोग्य सुविधांची मोठी भेट मिळाली आहे. यामुळे शहरातील आरोग्य सुविधा आता ग्रामीण भागात मिळणार आहेत.

यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला. ते म्हणाले, ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना गंभीर आजारांवरील उपचारांसाठी मोठ्या शहरांकडे धाव घ्यावी लागू नये, यासाठी शासनाच्या माध्यमातून आरोग्य सुविधांचे जाळे मजबूत करण्यात येत आहे. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, तज्ज्ञ डॉक्टर आणि दर्जेदार उपचार सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. गारगोटी येथे सुरू झालेले अत्याधुनिक नेत्र रुग्णालय आणि कॅथलॅबसारखी सुविधा भुदरगड तालुक्यासह परिसरातील नागरिकांसाठी आरोग्यदायी वरदान ठरेल. शासनाच्या आरोग्य योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

नेत्र रुग्णांसाठी अत्याधुनिक उपचारांची दारे खुली!

गारगोटी येथील ३० खाटांच्या शासकीय नेत्र रुग्णालयामध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आधुनिक IOL लेन्स, यॅग लेसर उपचार, चष्म्याचा अचूक नंबर तपासणी, काचबिंदू तपासणी व उपचार, लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारांची तपासणी, OCT स्कॅन, डोळ्यांच्या पडद्याची तपासणी अशा विविध अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे नेत्रविकार असलेल्या रुग्णांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

१९ कोटींच्या कॅथलॅबमुळे हृदयविकार रुग्णांना दिलासा!

हृदयविकाराच्या रुग्णांसाठी उभारण्यात येणारी अद्ययावत कॅथलॅब ही या प्रकल्पाची आणखी एक महत्त्वपूर्ण उपलब्धी ठरणार आहे. या सुविधेमध्ये १० आयसीयू बेड, अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, ASD रिपेअर आणि VSD रिपेअर यांसारख्या महत्त्वपूर्ण उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामुळे कॅन्सर, ब्रेनस्ट्रोक, हृदयविकाराच्या रुग्णांना आधुनिक उपचारांसाठी दूरच्या शहरांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होण्यास मदत होणार आहे.

गारगोटी येथे साकारलेले अत्याधुनिक नेत्र रुग्णालय आणि १९ कोटींच्या कॅथलॅबचा शुभारंभ ही केवळ आरोग्य सुविधांची भर नसून भुदरगड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आरोग्यसेवा आता ग्रामीण भागाच्या दारात पोहोचत असल्याने पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे सर्वत्र स्वागत होत आहे.

यावेळी भुदरगड तालुका सभापती विक्रम पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना तालुक्यातील आरोग्य सुविधांच्या विकासासाठी अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची आवश्यकता अधोरेखित केली. ग्रामीण जनतेला आरोग्याच्या मूलभूत आणि आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्याने सर्वसामान्य कुटुंबांना मोठा आधार मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती सारिका बाबा ऊर्फ यशवंत नांदेकर यांनीही आपल्या मनोगतातून या आरोग्य सुविधांचे महत्त्व विशद केले. नव्या वैद्यकीय सुविधांमुळे परिसरातील नागरिकांना वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार असून आरोग्य क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. दिलीप माने, उपसंचालक, आरोग्य सेवा कोल्हापूर यांनी केले. सूत्रसंचालन नंदकुमार निर्मळे यांनी केले, तर डॉ. सरिता थोरात जिल्हा शल्यचिकीत्सक, CPR कोल्हापूर. यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी सुनिता गोलाईत, सहसंचालक आरोग्य सेवा, पल्लवी तारळकर, वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय गारगोटी, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र कांबळे, डॉ. विशाल शेदवाड, जिल्हा परिषद सदस्या अर्चना निकम, उपसभापती अरुणा देसाई, पंचायत समिती सदस्य सुनिल किरोळकर, कल्याणी फगरे, धनंजय लाड, एकनाथ जाधव, उपअभियंता महेश कांजर, युवराज देसाई, कल्याणराव निकम, नंदकुमार ढेंगे, गोकुळ संचालक मदन देसाई, बाबा नांदेकर, नंदकुमार सूर्यवंशी, अशोक फराकटे, यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.