कोल्हापुरातील पाच तालमींमध्ये ‘पैलवान ग्रंथालय’; शरीरासोबत बुद्धी घडवण्याचा सपकाळ कुटुंबीयांचा पुढाकार
कोल्हापूर-WATCHTEAM : आखाड्यात उतरले की प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्यासाठी ताकद लागते; पण आयुष्याच्या आखाड्यात यशस्वी होण्यासाठी विचारांची ताकदही तितकीच महत्त्वाची असते. कुस्तीच्या पारंपरिक तालमीला वाचनसंस्कृतीची जोड देणारा असाच एक अभिनव उपक्रम कोल्हापुरात आकाराला येत आहे. पुण्यातील सपकाळ कुटुंबीयांनी कोल्हापुरातील पाच नामांकित तालमींना ‘पैलवान ग्रंथालय’ भेट देण्याचा संकल्प केला आहे. कुस्तीच्या आखाड्यात आता पुस्तकांचेही स्थान निर्माण होणार आहे.
पुण्यातील वंदना दत्तात्रय सपकाळ ऊर्फ माई यांच्या एकसष्ठीनिमित्त त्यांचे सुपुत्र गिरीष सपकाळ यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. शाहू स्मारक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात ‘पैलवान ग्रंथालय’ उपक्रमाच्या लोगोचे अनावरण खासदार धनंजय महाडिक आणि माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वंदना सपकाळ, गिरीष सपकाळ, नगरसेवक राजू लाटकर, वस्ताद आबा मुंडे, राम सारंग आणि दत्ताबाळ चव्हाण उपस्थित होते.
या उपक्रमाचे कौतुक करताना खासदार धनंजय महाडिक यांनी तालमींच्या भूमिकेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, कुस्तीगीरांना शक्तीसोबत युक्तीचीही गरज आहे. केवळ शरीर कमावून चालणार नाही, तर त्याला बुद्धीची जोड द्यावी लागेल. बदलत्या कुस्तीचे नियम, तंत्र आणि बारकावे समजून घेण्यासाठी वाचन आवश्यक आहे. तालीम संस्था या केवळ शरीर कमावण्याच्या फॅक्टरी नसून सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व घडवणारी विद्यापीठे आहेत.
आखाड्यातील ताकदीला विचारांची जोड
कुस्तीचे स्वरूप बदलत असताना पैलवानांसमोरील आव्हानेही वाढत आहेत. वस्ताद राम सारंग यांनी व्यसनाधीनता तसेच सप्लिमेंट्स आणि अंमली पदार्थांच्या चुकीच्या सेवनामुळे पैलवानांच्या आरोग्यावर होणाऱ्या गंभीर परिणामांकडे लक्ष वेधले. शरीर कमावण्याच्या नादात आयुष्यच धोक्यात येऊ नये, यासाठी योग्य आहार, शिस्त आणि ज्ञान आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तालमीमुळे शरीर घडते, तर सपकाळ कुटुंबीयांच्या या उपक्रमातून पैलवानांची बुद्धीही घडेल, अशी अपेक्षा दत्ताबाळ चव्हाण यांनी व्यक्त केली.
पुस्तकांतून मिळणार कुस्तीचे जागतिक भान
या ग्रंथालयांमध्ये विविध महापुरुषांची चरित्रे, आंतरराष्ट्रीय कुस्तीचे नियम, आहारशास्त्र आणि पैलवानांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला पूरक पुस्तकांचा समावेश असेल. त्यामुळे तालमीत सराव करणाऱ्या तरुणांना कुस्तीच्या मैदानाबाहेरील ज्ञानविश्वाचीही ओळख होणार आहे. केवळ पदके आणि विजय मिळवणारा नव्हे, तर विचारांनी समृद्ध आणि समाजाप्रती जबाबदारी जाणणारा पैलवान घडवणे, हा या संकल्पनेचा महत्त्वाचा हेतू आहे.
कार्यक्रमात दत्तात्रय सपकाळ आणि वंदना सपकाळ यांचा खासदार महाडिक आणि निवेदिता माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. वस्ताद शिवाजी पाटील आणि निवेदिता माने यांनीही मनोगत व्यक्त केले.
जयभवानी तालीम, राजर्षी शाहू कुस्ती केंद्र, राष्ट्रकुल कुस्ती संकुल, स्वर्गीय सदाशिव मंडलिक तालीम आणि करवीर कुस्ती संकुल या पाच संस्थांना पैलवान ग्रंथालयांचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी हंगेश्वर धायगुडे, पैलवान असिफ नदाफ, बबन बोराडे, राजेश काकडे, रामभाऊ पाटील, कादर मलबारी, ईश्वर परमार यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
कुस्तीच्या आखाड्यात शरीर घडते; पण पुस्तकांच्या सहवासात व्यक्तिमत्त्व घडते. या दोन्हींचा संगम घडवण्याचा सपकाळ कुटुंबीयांचा प्रयत्न कोल्हापूरच्या कुस्ती संस्कृतीला नवी दिशा देणारा ठरू शकतो.
























