विनायक जितकर
सूतगिरण्या सुरळीत सुरु राहाव्या यासाठी आगामी काळात राज्य शासन आणि बँकेकडून भांडवल एकाच वेळी जाईल.
मुंबई : सूतगिरण्या सुरु होण्यासाठी राज्य शासनामार्फत ४५ टक्के भांडवल, तर बँकेकडून ४० टक्के कर्ज आणि वैयक्तिक ५ टक्के अशा सूत्रानुसार सूतगिरणी सुरु होते. सूतगिरण्या सुरळीत सुरु राहाव्या यासाठी आगामी काळात राज्य शासन आणि बँकेकडून भांडवल एकाच वेळी जाईल अशी कार्यप्रणाली आखण्यात येणार असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य बळवंत वानखेडे, योगेश सागर यांनी संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी पुन्हा सुरु करण्याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, येणाऱ्या नवीन वस्त्रोद्योग धोरणामध्ये यापुढे वैयक्तिक ५ टक्के रक्कम तयार ठेवल्यानंतरच राज्य शासन आणि बँकाची रक्कम एकाच वेळी कशी देता येईल याची आखणी करण्यात येईल. संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणी १९९१ मध्ये सुरु झाली होती. या सूतगिरणीवर अधिकचा बोजा असल्याने ही सूतगिरणी सध्या बंद आहे. सन २००७ मध्ये राज्य सहकारी बँकेच्या थकित रकमेचा सूतगिरणीने भरणा न केल्याने गिरणीची यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे.