कोल्हापूरTEAM WATCH : भीमाशंकर परिसरात सुरू असलेल्या जंगलतोडीच्या पार्श्वभूमीवर निसर्गसंवर्धनाचा संदेश देणारा ‘रँगो’ हा चित्रपट चिल्लर पार्टी विद्यार्थी चित्रपट चळवळीतर्फे रविवारी शाहू स्मारक भवन येथे दाखविण्यात आला. चित्रपट पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी ‘आम्ही सारे रँगो बनू, सह्याद्रीचे रक्षण करू!’ अशी प्रतिज्ञा घेत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.
प्रारंभी सह्याद्री बचाव मोहिमेचे ‘रँगो’ म्हणून
अविनाश भाले आणि चार वर्षांच्या सिया रितेश तेजवानी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
मैत्रिणीच्या अंगावरील कपड्याला आग लागल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखून सियाने स्वतःच्या हाताने आग विझविण्याचा प्रयत्न केला. या धाडसात तिचा हात भाजला; मात्र मैत्रिणीचा जीव वाचला. तिच्या या धाडसाचे कौतुक म्हणून ‘गुरुपार’चे अविनाश शिरगावकर यांच्या हस्ते सियाला सन्मानित करण्यात आले. तिला स्टडी टेबल आणि चित्रकलेचे साहित्य भेट देण्यात आले.
या वेळी शिरगावकर म्हणाले, समाजातील चांगुलपणा अजूनही टिकून आहे. दुसऱ्याला मदत करण्याचे संस्कारही कायम आहेत, हे सियाच्या कृतीतून दिसून येते. चिल्लर पार्टीने पुढाकार घेऊन केलेल्या या सत्कारामुळे सियाला प्रोत्साहन मिळेलच, शिवाय अशा छोट्या कृतीतून आदर्श निर्माण होण्यासही मदत होईल. यावेळी संजय पाटील, सुधाकर सावंत, ओंकार कांबळे, शिवप्रभा लाड, सलीम महालकरी, अभय बकरे, गुलाबराव देशमुख, मिलिंद कोपार्डेकर तसेच सियाचे आई-वडील उपस्थित होते.
सह्याद्री वाचवा मोहिमेत सहभाग
दरम्यान, सह्याद्रीच्या संरक्षणासाठी सुरू असलेल्या ‘पारगड ते रायगड’ मोहिमेला यावेळी चिल्लर पार्टीने पाठिंबा जाहीर केला. बुधवारी पहिल्या टप्प्यात पन्हाळगडावर होणाऱ्या कार्यक्रमात चिल्लर पार्टी सहभागी होणार आहे, अशी माहिती संस्थापक मिलिंद यादव यांनी दिली.



























