पॉझिटिव्ह वॉच एक्सक्लुझिव्ह (Positive Watch Exclusive)
आजच्या वेगवान आणि डिजिटल युगात सोशल मीडियाने आपल्या दैनंदिन जीवनात अविभाज्य स्थान निर्माण केले आहे. मात्र, हाच सोशल मीडिया आजच्या तरुणाईसाठी एक न सुटणारे ‘चक्रव्यूह’ ठरत असून, याच्या विळख्यात अडकल्यामुळे तरुण पिढी आपल्या मूळ ध्येयापासून भरकटताना दिसत आहे. अभिमन्यूला चक्रव्यूहात शिरण्याचा मार्ग माहीत होता, पण बाहेर पडण्याचा मार्ग ठाऊक नव्हता; नेमकी हीच अवस्था आजच्या तरुणाईची झाली आहे. लहानांपासून ते अबालवृद्धांपर्यंत सर्वच जण आज मोबाईलच्या आहारी गेले आहेत. ‘भाकरीपेक्षा मोबाईल भारी’ अशी विदारक आणि मन सुन्न करणारी परिस्थिती सध्या समाजात पाहायला मिळत आहे. तंत्रज्ञानाचा हा बेसुमार वापर संपूर्ण पिढीला मानसिक अपंगत्वाकडे ढकलत असून, त्याचे अत्यंत गंभीर दुष्परिणाम व्यक्तीचे करिअर, कौटुंबिक नातेसंबंध आणि लहान मुलांच्या कोवळ्या मेंदूवर स्पष्टपणे दिसून येत आहेत.
सध्या तरुणांमध्ये आणि विशेषतः लहान मुलांमध्ये ‘रील्स’ पाहण्याचे प्रचंड फॅड वाढले आहे. अवघ्या तीस सेकंदांच्या या रील्सनी तरुणाईचा संयम आणि एकाग्रता पूर्णपणे हिरावून घेतली आहे. तासन्तास स्क्रीनसमोर खिळून राहिल्याने मुलांच्या डोळ्यांवर ताण येत असून त्यांची विचारशक्ती आणि सृजनशीलताही खुंटत आहे. या गंभीर समस्येला पालक आणि घरातील मोठी माणसेही तितकीच जबाबदार आहेत. आपण आपल्या मुलांच्या हातात खेळणी देण्याऐवजी महागडे मोबाईल देऊन स्वतःची सुटका करून घेतो, पण नकळत आपण त्यांच्या हातात विनाशाची दोरी देत आहोत, याचे भान आपल्याला उरलेले नाही. घरातील वडीलधारी मंडळीच जर सतत मोबाईलमध्ये गुंतलेली असतील, तर मुलेही त्यांचेच अनुकरण करणार हे उघड आहे. त्यामुळे, पालकांनी स्वतःचा मोबाईल वापर कमी करून मुलांना प्रत्यक्ष वेळ देणे, त्यांच्याशी संवाद साधणे ही आज काळाची नितांत गरज बनली आहे. आपली मुले मोबाईलवर नेमके काय पाहतात यावर लक्ष ठेवणे आणि त्यांना सोशल मीडियाच्या आभासी दुनियेतील धोक्यांची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा, मुलांच्या हट्टापायी आपणच त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले, याला केवळ आणि केवळ आपणच कारणीभूत राहू.
सोशल मीडियाच्या या चक्रव्यूहात अडकल्यास त्याचे अत्यंत भयानक आणि दूरगामी परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतात. आज एकाच छताखाली राहणारी माणसे एकत्र जेवतानाही एकमेकांशी बोलत नाहीत, तर आपापल्या स्क्रीनमध्ये डोके खुपसून बसलेली असतात; यातूनच नातेसंबंधांमध्ये मोठा दुरावा निर्माण होत आहे. ‘लाईक्स’ आणि ‘कमेंट्स’च्या खोट्या आकड्यांमध्ये तरुणाई स्वतःची खरी किंमत शोधू लागली आहे. इतरांचे दिखाऊ आणि रंगवलेले आयुष्य पाहून स्वतःला कमी लेखण्याची प्रवृत्ती बळावत असून, त्यातून इतरांबद्दल ईर्ष्या, अनावश्यक स्पर्धात्मक विकार आणि शेवटी तीव्र नैराश्य पदरी पडत आहे. स्वतःची विचार करण्याची क्षमता खुंटल्याने स्वतःबद्दल एक प्रकारची भ्रांती निर्माण होते आणि आत्मविश्वास डळमळीत होतो. एवढेच नव्हे, तर सोशल मीडियाच्या या अतिवापरामुळे सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक आणि ब्लॅकमेलिंगसारख्या गंभीर धोक्यांचे प्रमाणही प्रचंड वाढले असून आपण स्वतःहून या संकटांना निमंत्रण देत आहोत.
सोशल मीडिया हे प्रगतीचे एक उत्तम साधन नक्कीच आहे, परंतु त्याचा वापर हा केवळ गरजेपुरता आणि विवेकानेच व्हायला हवा. वरील सर्व धोक्यांचा प्रत्येकाने आजच अंतर्मुख होऊन विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. मोबाईल हा आपल्या हातातील गुलाम असावा, आपण मोबाईलचे गुलाम बनता कामा नये. उद्याचा दिवस पाहण्यासाठी आज रात्रीची शांत झोप गरजेची आहे, जी या निळ्या स्क्रीनने आपल्याकडून हिरावून घेतली आहे. आपण जर आजच जागे झालो नाही आणि या आभासी चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा ठाम निर्धार केला नाही, तर येणारी संपूर्ण पिढी मानसिकदृष्ट्या पंगू होईल आणि याचे भयावह परिणाम भोगण्यावाचून आपल्याकडे कोणताही पर्याय उरणार नाही. त्यामुळे वेळीच सावध व्हा, आभासी जगाच्या या मृगजळातून बाहेर पडा आणि आपल्या खऱ्या आयुष्याला, नात्यांना व ध्येयाला नवी दिशा द्या!
सचिन वसंत कांबळे
(Independent Journalist, घुणकी)
संपर्क : 7843046655
(Independent Journalist, घुणकी)
संपर्क : 7843046655

























