कोल्हापूर: क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खेळाने मन जिंकणाऱ्या के.एम.टी. आणि विजय स्पोर्टींगचे माजी क्रिकेटपटू प्रकाश दरवान यांनी खऱ्या आयुष्यातही धाडस आणि माणुसकीची दमदार खेळी करून दाखवली आहे. रंकाळा तलावात बुडणाऱ्या एका माऊलीला स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुखरूप बाहेर काढत त्यांनी तिला नवजीवन दिले. त्यांच्या या प्रेरणादायी प्रसंगावधानाचे ‘क्रिकेटवेडे कोल्हापूरी ग्रुप’च्या वतीने विशेष सोहळा आयोजित करून आजी-माजी क्रिकेटपटूंनी मनभरून कौतुक केले.
माजी खासदार तथा केडीसीएचे (KDCA) अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांच्या शुभहस्ते प्रकाश दरवान यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. संभाजीराजेंनी त्यांच्या या धाडसी कृतीची मनापासून प्रशंसा केली. एखाद्याचा जीव धोक्यात असताना क्षणाचाही विलंब न लावता मदतीसाठी धावून जाणे, हीच खरी कोल्हापुरी माणुसकी आहे. आजच्या काळात समाजात अशी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ‘खऱ्या हिरोंचा’ गौरव होणे अत्यंत गरजेचे आहे, अशा शब्दांत उपस्थितांनी दरवान यांच्या कार्याला सलाम केला.
या कौतुक सोहळ्यास माजी उपमहापौर संजय मोहिते, नंदकुमार बामणे, बाळू पसारे, बंडा बेडगकर, राजेश केळवकर, जॉनी यादव, प्रणिल इंगळे, दिपक घारगे, संदीप पाटील, कृष्णा धोत्रे, सुजय कसबेकर, संजय पाटील, राजू सुतार, रणजित चौगुले यांच्यासह ‘क्रिकेटवेडे ग्रुप’चे सदस्य आणि कोल्हापुरातील क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नेटके प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन ग्रुपचे ॲडमिन सुधर्म वाझे यांनी केले.

























