‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’चा संदेश देत रस्ते, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता
गारगोटी, प्रतिनिधी – नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी सामाजिक बांधिलकीचा संदेश देत श्री. आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगच्या पॉलीटेकनिक विभागातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS)च्या विद्यार्थ्यांनी वाघापूर (ता. भुदरगड) येथे स्वच्छता अभियान राबविले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरात स्वच्छतेचा जागर निर्माण झाला.
या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी वाघापूर परिसरातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला. ठिकठिकाणी साचलेला कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली. केवळ परिसराची स्वच्छता न करता विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत स्वच्छतेचे महत्त्वही पटवून दिले. ‘स्वच्छ गाव, सुंदर गाव’, ‘स्वच्छता हीच सेवा’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता स्वच्छता राखावी, पर्यावरणाचे संवर्धन करावे आणि आपल्या गावाचे सौंदर्य जपावे, असे आवाहन विद्यार्थ्यांनी नागरिकांना केले.
विद्यार्थ्यांच्या या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्येही स्वच्छतेबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले. सामाजिक कार्यातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि समाजसेवेची भावना अधिक दृढ होण्यास या अभियानाची मदत झाली. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले. यावेळी वाघापूरचे सरपंच बापूसो आरडे, उपसरपंच बाळासाहेब शिंदे, युवराज आरडे, पोलीस पाटील दत्तात्रय घाडगे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, NSSचे स्वयंसेवक व विद्यार्थी उपस्थित होते.











































































